यवतमाळ : लतादीदींच्या निधनाच्या धक्क्यानं त्यांच्या चाहत्या दोन वृद्ध मैत्रिणींनी सोडले प्राण

मृतदेह
मृतदेह

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा

भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी दूरचित्रवाणीवर झळकत होती. ही बातमी पाहताच, पुसद तालुक्यातील माळपठारावरील म्हैसमाळ येथील दोन मैत्रिणींनीही आपले प्राण सोडले. त्या दोघीही लहानपणापासून लतादीदींच्या चाहत्या होत्या. चंद्रभागाबाई बळीराम बेद्रे (८३) आणि सुंदलबाई हरिभाऊ राठोड (८२) अशी या दोन जीवलग मैत्रिणींची नावे आहेत. या दोघींचीही घरे म्हैसमाळ येथे समोरासमोर आहेत.

लहानपणापासून दोघीही लतादीदींच्या चाहत्या होत्या. दोघीही रेडिओवर लतादीदींचे गाणे ऐकायच्या. 'ऐ मेरे वतन के लोगो'पासून 'आता विसाव्याचे क्षण' या गीतापर्यंत त्यांना लतादीदींची सर्वच गाणी आवडत होती. ऐंशीच्या दशकात टीव्ही आल्यानंतर त्यांनी टीव्हीवरही लतादीदींच्या आवाजातील अनेक गाणी पाहिली आणि ऐकली. चंद्रभागाबाई आणि सुंदलबाई यांची घरे समोरासमोर होते. रोजच लतादीदींचे कोणते ना कोणते गाणे दोघी मिळून ऐकणे हा त्यांचा नित्यक्रम होता. रविवारी लतादीदींच्या निधनाचे वृत्त दूरचित्रवाणीवर झळकताच, दोघींचाही ऊर भरून आला. दोघींनाही अत्यंत दु:ख झाले. त्या विरहातच दुपारच्या सुमारास एकापाठोपाठ एक त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे म्हैसमाळ येथे शोककळा पसरली. चंद्रभागाबाई बेद्रे यांच्या मागे प्रकाश, सुखदेव, सुरेश ही मुले व शुभद्राबाई ही विवाहित मुलगी आहे. सुंदलबाई यांच्या मागे बाबूसिंग, जयवंत, वसंतराव, पुरणसिंग, अंबादास ही मुले तर लीलाबाई, शीला, रेणुका या तीन मुली आहेत.

दीड तासाच्या अंतराने झाले निधन

चंद्रभागाबाई बेद्रे आणि सुंदलबाई राठोड यांची गेल्या ५० वर्षांपासून मैत्री होती. लतादीदींच्या निधनाचे वृत्त ऐकल्यानंतर, रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास प्रथम चंद्रभागाबाई यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. लतादीदींच्या विरहातच त्यांनी प्राण सोडले. लतादीदी आणि चंद्रभागाबाईंच्या निधनाचे दु:ख अनावर होऊन सुंदलबाई यांनाही हृदयविकाराचा झटका आला. त्यांनीही रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास या जगाचा निरोप घेतला.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : स्वरांचा पारिजात अबोल झाला. गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news