लता मंगेशकर : सरस्वती माँ…

लता मंगेशकर : सरस्वती माँ…
Published on
Updated on

आज माझी सरस्वती माँ आपल्या सर्वांना सोडून गेली आहे. हृदय अत्यंत शोकाकूल झालं आहे. त्यांच्याविषयी किती आणि कोणकोणत्या आठवणी सांगू? लतादीदी या स्वरसम्राज्ञी होत्या. स्वरसरोवरातील राजहंस होत्या. परिपूर्णता हे त्यांच्या गाण्याचं दुसरं नाव. गाण्यातील सिद्धी कशी प्राप्त होते, याचं लतादीदी हे उत्तम उदाहरण होतं. जगात देव आहे की नाही, हे कोणी पाहिलेलं नाही; पण लतादीदींच्या रूपानं मला तो भेटला. या मंत्रभारल्या दिव्य स्वरांची मोहिनी चिरंतन काळ राहणारी आहे.

स्वतःला 'भाग्यवंत' म्हणवून घेण्याचे क्षण अनेकांच्या आयुष्यात फार कमी वेळा येतात; पण आपण सारे एका गोष्टीसाठी आयुष्यभर स्वतःला भाग्यवान म्हटलं पाहिजे, ती म्हणजे साक्षात सरस्वतीदेवी असलेल्या लतादीदींचा अमोघ स्वर आपल्याला ऐकण्याची संधी मिळाली. त्यातही मी स्वतःला अत्यंत नशीबवान मानतो की, मला त्यांच्यासोबत गाण्याचं भाग्य लाभलं. याबद्दल मी परमेश्‍वराचे शतजन्म आभार मानत राहीन. ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने गगनाची उंची गाठली आहे आणि तरीही त्यांचे पाय सामान्यांप्रमाणेच जमिनीवर आहेत, अशा माणसांच्या बाबतीत स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं नाव आदराने अग्रस्थानी घ्यावं लागेल.

'मेरा रक्षक' या चित्रपटाचं संगीत संगीतकार रवींद्र जैन करत होते. त्यावेळी मला त्यांच्याशी जवळून ओळख करून घेण्याची संधी मिळाली. मी एक गायक आहे, अशा शब्दांत रवींद्र जैन यांनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. खरं तर त्यांच्याशी परिचय होताना मी काहीसा हबकलो होतो; पण दीदींनी माझी आपुलकीने सविस्तर चौकशी केली. त्यावेळी मी कोल्हापूरचा असल्याचं कळल्यानंतर त्यांना माझ्याविषयी अधिकच आपुलकी वाटू लागली. त्यांनी माझ्या गाण्यांच्या कॅसेट आणायला सांगितल्या. त्यांनी अनेक प्रसिद्ध संगीतकारांना माझ्या गाण्याबद्दल सांगितलं. हा खूप चांगला गातो, असं सांगितलं. खरे पाहता ही माझ्या कारकिर्दीला मिळालेली सुंदर कलाटणीच होती. त्यामुळे मंगेशकर कुटुंबाचं माझ्या आयुष्यात एक अढळ स्थान आहे.

मी लतादीदींबरोबर पहिलं द्वंद्वगीत 'क्रोधी' या चित्रपटासाठी गायलं. 'चल चमेली बाग मे' असेे त्या गाण्याचे बोल होते. त्या गाण्याचं रेकॉर्डिंग त्यांच्याबरोबर होणार आहे, या कल्पनेनेच मी खूप घाबरून गेलो होतो; पण लतादींदींनी माझ्याशी सहजपणे बोलून ती दूर केली. त्या म्हणाल्या, 'तू असाच गा, तसाच गा' असं तुला आजपर्यंत अनेकांनी सांगितलं असेल; पण तू घाबरू नकोस. तू तुला हवं त्या पद्धतीने गा. त्यांच्या या बोलण्यामुळे मी निश्‍चिंत झालो. मनावरचं दडपण सरलं. पुढील काळात नंतर मी त्यांच्याबरोबर अनेक गाणी म्हटली.

वेगवेगळ्या भाषेतील गाणी गाणार्‍या लतादीदी म्हणजे गाण्यातील पूर्णबिंदू आहेत. माझ्याकडे असंख्य ध्वनिफिती आहेत. पण, त्यातील 98 टक्के ध्वनिफिती या दीदींच्याच आहेत. आयुष्यात सुख-दु:ख अडीअडचणीचे प्रसंग येत असतात; पण अशा प्रसंगात दीदींच्या गाण्यामुळे मी रिलॅक्स होतो. दीदींकडून नेहमीच काही ना काही चांगलं शिकायला मिळालं. त्यांच्या प्रत्येक गाण्यात अचूकतेचा, परिपूर्णतेचा ध्यास होता. आपला सूर कसा लागतो आहे, गाण्यातील शब्द कसे लागत आहेत, उच्चारातील भावना नीट येतात की नाही, इत्यादी गोष्टींकडे त्यांचं नेहमीच लक्ष असायचं. गायक म्हणून समृद्ध होण्यासाठी दीदींसारखं विद्यापीठ असणं खूप गरजेचं असतं.

कलावंत म्हणून लतादीदी थोर होत्याच. पण, माणूस म्हणूनही त्या श्रेष्ठ होत्या. एखादी व्यक्‍ती भेटल्यानंतर त्याची त्या आस्थेवाईकपणे चौकशी करत. त्यांचा चेहरा वरकरणी गंभीर असला, तरी त्यांच्यामध्ये एक अस्सल विनोदबुद्धी होती. त्यांच्या बोलण्यातून अनेकदा त्याची प्रचिती यायची. गाण्याइतकाच त्यांचा स्वभावही मधुर होता. मला आठवतंय, 'लेकीन' या चित्रपटाची निर्मिती लतादीदींनी केली होती. त्यासाठी पार्श्‍वगायन करण्याची संधी मला मिळाली.

या चित्रपटात 'सुरमयी शाम' हे गीत मी गायिले आहे. हे गाणे खूप गाजलं. ते लोकप्रिय होण्यामागेही लतादीदींचीच प्रेरणा आहे. या चित्रपटाला हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलं आहे. तालमीनंतर गाणं प्रत्यक्ष रेकॉर्ड करताना समोर लतादीदी बसल्या होत्या. त्यामुळे मला जास्तच टेन्शन आलं होतं. आपलं गाणं कसं होतं आणि त्यामुळे दीदींना काय वाटेल, याचं ते टेन्शन होतं. त्यांच्या ते लक्षात आलं असावं.

त्यावेळी त्या मला म्हणाल्या, 'सुरेश, मला फक्‍त इतकंच सुचवायचं आहे की, या गाण्यातील 'साँस' हा शब्द अशा पद्धतीने उच्चारला पाहिजे की, त्यामुळे त्यातून श्‍वास घेतल्याची जाणीव होईल.' त्यांच्या या वाक्याने माझ्या मनावरचं टेन्शन कमी झालं आणि त्यांना हवं होतं तसं गाणं माझ्या कंठातून उमटलं. त्यांच्याबरोबर अनेक गाणी मी गायिली. त्यामध्ये 'मेघा रे मेघा रे', 'मेरी किस्मत मे तू नही शायद', 'इन हसी वादियों में', 'ये आँखे देखकर', 'माझे रानी माझे मोगा', 'चिंब पावसानं रान झालं आबादानी' अशी असंख्य गाण्यांचा उल्लेख करता येईल. हे सर्व माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहेत.

धाकट्या भावाप्रमाणे त्यांनी माझ्यावर प्रेम केलं. मी या क्षेत्रात यशस्वी झालो, त्याचं बरंचसं श्रेय लतादीदींना जातं. परमेश्‍वर कोणीही पाहिलेला नाही; पण लतादीदी यांच्यासारख्या गानसरस्वतीच्या रूपाने तो मला भेटला, असं मी मानतो. जवळपास 15 ते 18 वर्षे दरवर्षी लतादीदी यांनी मला पद्मश्री पुरस्कार मिळावा, याकरिता राष्ट्रपतींना पत्रं लिहिली होती. अखेर त्यांची ही प्रखर इच्छा पूर्ण झाली. अशी ही सरस्वती माँ आज आपल्याला सोडून गेली आहे. याचं दुःख किती आणि काय सांगावं..?

(शब्दांकन : स्वाती देसाई)

– सुरेश वाडकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news