एका युगाचा अंत! संसदेत लतादीदींना वाहिली श्रद्धांजली | पुढारी

एका युगाचा अंत! संसदेत लतादीदींना वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

अब्जावधी अंत: करणात चार पिढ्यांपासून अधिराज्य गाजवणाऱ्या गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर (#LataMangeshkar) तथा दीदी यांचे रविवारी मुंबईत महानिर्वाण झाले. दरम्यान, लतादीदींना आज सोमवारी राज्यसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. एक मिनिट मौन पाळून लतादीदींना श्रद्धांजली वाहण्यात आली.

लता मंगेशकर (#LataMangeshkar) यांच्या निधनाने देशाने एक महान पार्श्वगायिका आणि भारतीय संगीत आणि चित्रपट सृष्टीतील एक उत्तुंग व्यक्तिमत्व गमावले आहे. त्यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला आहे आणि संगीताच्या क्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा भावना राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकैय्या नायडू यांनी व्यक्त केल्या.

सारे विश्व व्यापून राहिलेल्या अलौकिक, दैवी सप्तसुरांनी काल रविवारी या नश्वर जगाचा त्याग करून शाश्वत स्वर्गभूमीकडे प्रयाण केले. अब्जावधी अंतःकरणात चार पिढ्यांपासून अधिराज्य गाजवणार्‍या गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर तथा दीदी यांचे रविवारी मुंबईत महानिर्वाण झाले. सर्वसामान्यांपासून असामान्यांपर्यंत सुरेल जीवनाचा अविभाज्य अंग बनलेले दीदींचे अवीट, दैवी सप्तसूर काळाच्या पडद्याआड अंतर्धान पावले आणि सप्तसुरांचा युगान्त झाला! जिच्या सुरेल कंठातील भूपाळी ऐकून भारतीय माणूस सकाळी जागा होत होता आणि त्याच सुरेल कंठातील अंगाई ऐकता ऐकता, रात्री झोपी जात होता; ती गंधर्वकन्या अनंतात विलीन झाली! आपल्या रसिकांच्या हातांवर अवीट सुरांचे देणे कायमचे ठेवून देत लतादीदींनी जगाचा निरोप घेतला. विसाव्या आणि एकविसाव्या शतकावर अमीट नाममुद्रा उमटवणारे देवदत्त स्वर कायमचे विसावले. त्यांच्या निधनाने चित्रपट, संगीत क्षेत्रात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

Back to top button