नाशिक : पत्नीसह मुलांनी फोडला हंबरडा, सिन्नरच्या वीर जवानाला अखेरचा निरोप

जवान गणेश जगताप यांच्यावर
लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
जवान गणेश जगताप यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील कणकोरी येथील भूमिपुत्र, भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान गणेश संपत जगताप यांचे बुधवारी (दि. 14) सायंकाळी 4 च्या सुमारास निधन झाले. डेंग्यू संसर्गाची बाधा झाल्याने ते आजारी होते. दिल्ली येथील लष्करी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कणकोरी येथे शुक्रवारी (दि. 16) दुपारी 2 वाजता लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिल्लीतील लष्करी मुख्यालयातील सोपस्कार पार पडल्यानंतर विशेष विमानाने त्यांचे पार्थिव सकाळी 10.30 वाजता शिर्डी विमानतळावर आणण्यात आले. तेथून त्यांच्या मूळ गावी कणकोरी येथे पार्थिव नेण्यात आले. काही वेळ पार्थिव घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर सजवलेल्या रथामधून जगताप यांचे पार्थिव कणकोरी गावात आणले गेले. 'अमर रहे अमर रहे शहीद जवान अमर रहे' अशा घोषात एनसीसी विद्यार्थ्यांच्या बँड पथकाने मानवंदना दिली. संपूर्ण गाव अंत्यदर्शनासाठी उपस्थित झाला होता. भर पावसामध्ये शासकीय अधिकारी, ग्रामस्थ जवान जगताप यांना निरोप देण्यासाठी उपस्थित होते. गावातील ग्रामपंचायत समोर तात्पुरते अमरधाम तयार करण्यात आले होते. यावेळी जवान गणेश जगताप यांचे भाऊ अनंता जगताप यांनी अग्निडाग दिला. यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवा नेते उदय सांगळे, माजी जिल्हा परिषद सदस्य सीमंतीनी कोकाटे, भाजपचे तालुका प्रभारी जयंत आव्हाड, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, नगरसेवक दिनकर पाटील, प्रभारी तहसीलदार प्रशांत पाटील, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, पोलिस निरीक्षक सागर कोते यांच्यासह ग्रामस्थांनी मानवंदना दिली.

कुटंबीयांनी फोडला हंबरडा 

जवान गणेश जगताप यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, सहा महिन्यांचा मुलगा, चार वर्षांची मुलगी, बहीण, भाऊ असा परिवार आहे. पार्थिव गावात आल्यानंतर कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. कुटुंबीयांच्या आक्रोशाने उपस्थितांची मने हेलावली होती.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news