पिंपरी : पावसाने दाणादाण, पिंपरी-चिंचवडसह मावळ, उपनगरांत पावसाचा जोर | पुढारी

पिंपरी : पावसाने दाणादाण, पिंपरी-चिंचवडसह मावळ, उपनगरांत पावसाचा जोर

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड, उपनगर आणि मावळ परिसरात शुक्रवारी (दि.16) पावसाने दाणादाण उडवली. नोकरी-व्यवसायानिमित्त कामाला जाणारे नागरिक, शालेय विद्यार्थी यांची पावसामुळे धांदल उडाली होती. शुक्रवारी पहाटेपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर दिवसभर कायम होता. शहर परिसरात दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. शहरातील अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचले होते. पवना धरण क्षेत्रात दिवसभरात 58 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सायंकाळी पावसाने उघडीप घेतली. पवना आणि मुळशी धरण 100 टक्के भरले असल्याने दोन्ही धरणांतून विसर्ग वाढविण्यात आला आहे. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्याने धरणाच्या सांडव्याद्वारे आणि पावर आऊटलेटद्वारे एकूण 10 हजार क्युसेक विसर्ग करण्यात येत होता.त्यानंतर तो कमी करण्यात आला. तर, मुळशी धरणाच्या सांडव्यावरून 26 हजार 400 क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार विसर्ग वाढवून 30 ते 35 हजार क्युसेकपर्यंत करण्यात येणार असल्याचे मुळशी धरणाचे अधिकारी बसवराज मुन्नोळी यांनी स्पष्ट केले.

पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली. दिवसभरात 58 मि.मी. पावसाची नोंद झाली. 1 जूनपासून आतापर्यंत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 2 हजार 595 मि.मी. इतका पाऊस झालेला आहे. धरण 100 टक्के भरलेले असल्याने धरणातून एकूण 10 हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. पाणलोट क्षेत्रात पडणार्‍या पावसाच्या प्रमाणानुसार धरणातून सोडण्यात येणार्‍या विसर्गामध्ये घट करत सायंकाळी उशिरा 8 हजार आठशे क्युसेक विसर्ग करण्यात आला; तसेच नदीकाठावरील रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन पवना धरणाचे उपविभागीय अभियंता अशोक शेटे यांनी केले.

हवामान विभागाचा अंदाज
पुणे हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच-सहा दिवस पुणे परिसरात हलक्या व तुरळक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. घाट विभागात शनिवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पालक, विद्यार्थ्यांची गैरसोय
पावसाला शुक्रवारी पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सकाळी नोकरी-व्यवसायानिमित्त घराबाहेर पडणार्‍या नागरिकांची एकच धांदल उडाली. त्याचप्रमाणे सकाळी दुचाकीवर मुलांना शाळेत सोडवण्यास गेलेल्या पालकांचीही मोठी गैरसोय झाली. पिंपरी-चिंचवड शहरात सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे काही ठिकाणच्या रस्त्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली.

मोरया गोसावी मंदिरात शिरले पाणी
शहर तसेच मावळ परिसरात होत असलेल्या जोरदार पावसामुळे पवना नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे चिंचवड येथे पवना नदीकाठी असलेल्या मोरया गोसावी मंदिरातही नदीचे पाणी शिरले होते.

 

Back to top button