शेलार यांच्याविरोधात गुन्हा : देवेंद्र फडणवीस म्हणाले, कदाचित… | पुढारी

शेलार यांच्याविरोधात गुन्हा : देवेंद्र फडणवीस म्हणाले, कदाचित...

मुंबई, पुढारी ऑनलाईन : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी आशिष शेलार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.  यावरुन भाजप आणि शिवसेना आमने-सामने आले आहेत. ‘आशिष शेलार यांना शांत करण्यासाठीच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यास आला असावा, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केला.

शेलार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यामुळे भाजप आक्रमक झाली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी शेलार यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकाबाहेरही समर्थकांनी गर्दी केली असून आंदोलन केले जात आहे.

फडणवीस म्हणाले, ‘भाजपचा कोणताही नेता आणि विशेषत: आशिष शेलार हे कोणत्याही महिलेबद्दल चुकीचा शब्द वापरू शकत नाहीत. महापौरांबद्दल तर अजिबात नाही. काल त्यांची पत्रकार परिषद किंवा प्रेस नोटचा चुकीचा अर्थ काढून गुन्हा दाखल केला आहे. शेलार शिवसेनेविरोधात आक्रमकतेने बोलत आहेत. त्यामुळे त्यांना शांत करण्यासाठी गुन्हा दाखल केला आहे का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

आशिष शेलार म्हणाले…

राज्यात सध्या सत्ता आणि पदाचा दुरुपयोग केला जात आहे. खोटी तक्रार देऊन,खोटा गुन्हा दाखल केला जात आहे. सत्तेचा दुरुपयोग कसा केला जातो याचे हे जिवंत उदाहरण आहे. मी कोणत्याही महिलेबाबत, महापौरांबाबत किंवा कोणत्याही व्यक्तीबाबत अपमानास्पद वागू शकत नाही. मी कुठलाही गुन्हा केलेला नाही. सातत्याने दोन दिवस वेगवेगळ्या पोलिस स्थानकात दबावतंत्र वापरून, सत्तेचा दुरुपयोग करून हा खोटा गुन्हा दाखल केला आहे., असे शेलार यांनी म्‍हटले आहे.

‘अर्थाचा अनर्थ केला…’

वरळीच्या बीडीडी चाळीतील दुर्घटनेबाबत बोलताना आशिष शेलार यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. सिलिंडरचा स्फोटात चार महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आणि पाठोपाठ त्याच्या वडिलांचाही मृत्यू झाला होता. ७२ तासांनंतर महापौर किशोरी पेडणेकर हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. याचा संदर्भा देत शेलार यांनी टीका केली हाेती.

हेही वाचलं का? 

Back to top button