

वाई बाजार; पुढारी वृत्तसेवा : भोसा रेतीघाटावर वाळू माफियाच्या दोन गटात तुफान गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना काल (दि.२८) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी महागाव पोलिसांत २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. (Nanded News)
पैनगंगा नदीक्षेत्रात रेतीमाफियांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत असतानाच काल (दि. २८) रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास महागाव तालुक्यातील भोसा घाटावर रेतीमाफियांच्या दोन गटात तुफान गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली.
या गोळीबारात तब्बल २५ राऊंड फायर झाल्याची चर्चा होत आहे. सदरची रेतीमाफियांमधील गोळीबाराची थरारक घटना रस्त्याच्या कारणावरून झाल्याची प्राथमिक स्वरूपाची माहिती पुढे येत आहे. महागाव व आर्णी तालुक्याच्या सीमेवरील साकूर व भोसा या दोन वाळू घाटांवर काल रात्री १०.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. (Nanded News)
या घटनेत ४ ते ५ टिप्पर, चार चाकी वाहन आणि इतरही दोन वाहनांची तोडफोड करण्यात आली. महागाव तालुक्यातील दोन घाटांमधील रस्त्यावरून माफियांमध्ये वाद होवून यात वाळू माफियांच्या दोन गटांकडून फायरींगबरोबरच हाणामारी, दगडफेकीची घटना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच काल रात्री उशिरा पोलीस विभागातील अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, स्थानिक गुन्हे शाकेचे पुसदचे गजानन गजभारे, महागाव स्टेशनचे ठाणेदार सोमनाथ जाधव यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली.
यानंतर सुरेश ढाले यांच्या फिर्यादीवरून हाणामारीतील २५ जणांवर विविध कलमा अन्वये २५ जणांवर महागाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. (Nanded News)
पुढील तपास अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड, ठाणेदार सोमनाथ जाधव, सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद सरकटे, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत आहे..
हेही वाचा :