सिंधुदुर्ग : सागवे येथे सर्पदंशाने ८ वर्षीय मुलाचा मृत्यू | पुढारी

सिंधुदुर्ग : सागवे येथे सर्पदंशाने ८ वर्षीय मुलाचा मृत्यू

देवगड, पुढारी वृत्तसेवा : राजापूर तालुक्यातील सागवे हमदारेवाडी येथील राहुल राजू पर्येंकर या ८ वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. त्याला देवगड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे सांगितले. ही घटना आज (दि.२९) दुपारी दोनच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ बेळगाव खानापूर पिंपरी येथील राजू पर्येकर मागील ४ वर्षांपासून कामानिमित्त सागवे हमदारेवाडी येथे पत्नी मुलगा व दोन मुली यांच्यासोबत राहत आहेत. आज ते कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यांच्या घरी पत्नी आणि मुले होती. सुट्टी असल्याने सर्व मुले एकत्रित घराच्या पाठीमागे असलेल्या कलम बागेत खेळत होती. दुपारी जेवण आटपून पुन्हा खेळण्यास गेली.

यावेळी राहुल याच्या डाव्या पायाला सर्पदंश झाला. मात्र, त्याने आपल्या पायाला काटा टोचल्याचे आईला सांगितले. या दरम्यान, त्याला चक्कर येऊ लागल्याने कातळी येथील डॉक्टराकडे नेले. त्यांनी उपचारासाठी देवगड येथे पाठविले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे सांगितले.

राहुल हा इयत्ता दुसरीमध्ये शिकत होता. त्याच्या दुर्दैवी मृत्यूने सागवे गावात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत देवगड पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली. देवगड ग्रामीण रुग्णालयात रितसर पंचनामा करून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक केसरकर आणि पोलीस हवालदार महेंद्र महाडिक करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button