कोल्हापूर : हजगोळी येथील वृद्धाची गळा चिरून हत्या; मृतदेह नदीत आढळला | पुढारी

कोल्हापूर : हजगोळी येथील वृद्धाची गळा चिरून हत्या; मृतदेह नदीत आढळला

चंदगड; पुढारी वृत्तसेवा : हजगोळी येथील ह.भ.प वसंत पांडुरंग पाटील ( वय ६५ ) हे २६ मार्च २०२४ पासून बेपत्ता झाले होते. दरम्यान आज (दि.२९) सकाळी सातच्या सुमारास त्यांचा मृतदेह जंगमहट्टी धरणावरील हंझहोळ नदी पात्रात आढळला. त्यांचा धारधार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याचे शव विच्छेदनंतर स्पष्ट झाले आहे.

वसंत पाटील हे रविवारी (दि. २४) सायंकाळी सव्वाचार वाजता हाळ नावाच्या शेताकडील काजू घेऊन येतो, असे पत्नी यल्लूबाई यांना सांगून निघून गेले होते. त्यानंतर ते रात्री घरी परतले नसल्याने घरच्यांकडून त्यांचा शोध घेण्यात आला. शोधाशोध करूनही ते मिळून न आल्याने ते बेपत्ता झाल्याची वर्दी लहान भाऊ जोतिबा यांनी चंदगड पोलिसात दिली होती. काजूच्या बागेतून दुचाकीसह ते गायब होते. घटनास्थळी त्यांचे चप्पल आणि रक्ताचे डाग आढळून आले होते. यावरून त्यांचा घातपात झाल्याचा संशय पंचक्रोशीत व्यक्त केला जात होता. गेल्या दोन दिवसांपासून चंदगड पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने हजगोळी परिसर पिंजून काढला होता. दरम्यान आज (शुक्रवारी) सकाळी ७ वाजता पोहायला गेलेल्या तरुणांना त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. काजूच्या बागेत बोलावून त्यांची हत्या केली असावी, असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. पोलिसांना खूनाचे धागेदोरे सापडले असून लवकरच आरोपीला ताब्यात घेऊ, असा विश्वास पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. अधिक तपास पीएसआय शेखर बारामती, पो. हे. कॉ. अमोल पाटील करत आहेत.

मृतदेह चार चाकीमधून नेला

काजू गोळा करतांना अचानक वसंत यांच्यावर हल्ला झाला असावा. बेशुद्ध पडल्यानंतर त्यांच्या गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. मयत झाल्यानंतर त्यांचा मृतदेह चारचाकी गाडीतून नदीकडे नेला. तसेच त्यांची दुचाकीही पाण्यात टाकली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.

Back to top button