नाशिक : पुढारी वृत्तसेवा-काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा दि. १३ व १४ मार्चला नाशिक जिल्ह्यात येत असून, यात राहुल गांधी यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व ठाकरे गटाच्या युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत. शरद पवार हे राहुल गांधी यांच्या चांदवड येथील शेतकऱ्यांच्या सभेत, तर आदित्य ठाकरे हे नाशिकमधील रोड शोमध्ये सहभाग होणार आहेत.
भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त मालेगाव येथे दि. १३ मार्च रोजी राहुल गांधी यांचे आगमन होईल. तेथे ते नागरिकांशी संवाद साधतील. त्यानंतर रात्री सौंदाणे येथे एका शेतकऱ्याच्या शेतात ते मुक्काम करणार आहेत. दि. १४ मार्चला सकाळी ८ वाजता चांदवड येथे दाखल होतील. या ठिकाणी ते कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर पिंपळगाव बसवंत येथे रोड शो करतील. दुपारी 2.30 ला नाशिकमध्ये दाखल होतील. नाशिकमध्ये ते रोड शो करतील. नाशिकमधील शालिमार चौकातील स्व. इंदिरा गांधी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करत पंचवटीतील श्रीकाळारामाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर पुढे त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन जव्हारच्या दिशेने रवाना होणार आहेत.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील दि. १३ व १४ मार्च असे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. दि. १३ तारखेला त्यांची सभा निफाडला होत आहे. त्यानंतर ते नाशिकमध्ये मुक्कामी असणार असून, १४ तारखेला चांदवड येथील राहुुल गांधींच्या दौऱ्यात सहभागी होणार आहेत. चांदवड येथील शेतकरी संवादावेळी पवार उपस्थित राहणार असून या वेळी युवासेनेचे नेते आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीचे नियोजन शिवसेना ठाकरे गटाकडून सुरू आहे. यानिमित्ताने महाविकास आघाडीचे प्रमुख नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्याने भारत जोडो न्याय यात्रेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
हेही वाचा :