महापुराचा त्रास कायमचा बंद करू; मुख्यमंत्र्यांची ग्वाही | पुढारी

महापुराचा त्रास कायमचा बंद करू; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर आणि सांगलीचा महापुराचा त्रास कायमचा बंद करणार, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत कोरोची (ता. हातकणंगले) येथे आयोजित महिला मेळाव्यात दिली. हे अभियान राज्यातील दोन कोटी महिलांच्या आयुष्यात क्रांती घडवेल, असा विश्वासही व्यक्त करत शहरात महिला सुरक्षा अभियान सुरू केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यंत्रमागांना वीज सवलत देण्याची घोषणा त्यांनी केली.

पंचगंगा प्रदूषण रोखण्याबरोबरच कोल्हापूर खंडपीठाचा प्रश्नही लवकरच निकाली काढू, असे सांगत शेतकर्‍यांकडून केली जाणारी 200 पट पाणीपट्टी वसुलीला स्थगिती देत असल्याची घोषणाही त्यांनी केली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ताराराणींनी अतुलनीय शौर्य गाजवून मराठा साम—ाज्याचे, माता-भगिनींचे रक्षण केले. राज्यकारभारात जनसेवेत आदर्श निर्माण करून अहिल्यादेवी होळकर यांनी आपला ठसा उमटवला, सावित्रीबाई फुले यांनी देशात स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. त्यांचेच आपण वारसदार आहोत, याचा सार्थ अभिमान आहे. महिला आता अबला नाही, त्या सबला आहेत. रणरागिणी आहेत. त्यांच्या नादाला कुणी लागू नये. राज्यात महिला सुरक्षित राहाव्यात म्हणून महिला धोरण जाहीर केले.

महिला-पुरुष समानतेची भूमिका आहे. त्यांना समानतेच्या वाटेवर आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखवले. नव्या संसद भवनात पहिले विधेयक महिला आरक्षणाचे मंजूर झाले. ही हिंमत मोदींनी दाखवली, असे सांगत शिंदे म्हणाले, उज्ज्वला योजनेतून महिलांचे अश्रू पुसण्याचे काम केले, महिलांच्या नावे पक्की घरे करून त्यांना आत्मविश्वास दिला. लखपती दीदी, स्टँडअप इंडिया, प्रधानमंत्री मुद्रा योजना यासारख्या अनेक योजनांतून डबल इंजिन सरकारने महिलांना बळ दिले.

शिंदे म्हणाले, महिला बचत गटांचे खेळते भांडवल 15 हजारांवरून दुप्पट 30 हजार केले. ‘सीआरपी’चे मानधन दुप्पट केले. अंगणवाडी सेविका, मदतनिसांचे मानधन वाढवले, त्यांच्या रिक्त जागा भरण्याचे काम सुरू आहे. त्यांना मोबाईल देण्याचाही निर्णय घेतला आहे. आशा स्वयंसेविकांना सरकार निराश करणार नाही. दहा शहरांतील 5 हजार महिलांना ‘पिंक रिक्षा’ देण्याचा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास विभागाला 3 हजार कोटींची तरतूद केली आहे.

महापुराचा त्रास कायमस्वरूपी बंद करणार

कोल्हापूरचा पूर कायमचा बंद झाला पाहिजे, याकरिता जागतिक बँकेच्या मदतीने 3,200 कोटींचा प्रकल्प राबविला जात असल्याचे सांगत शिंदे म्हणाले, या प्रकल्पातून कोल्हापूरचा महापुराचा त्रास कायमस्वरूपी दूर केला जाईल. पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी 750 कोटींचा ‘डीपीआर’ तयार केला. प्रदूषण रोखण्यासाठी जिथे जिथे आवश्यकता आहे, त्या ठिकाणी ‘एसटीपी’ उभारले जाणार आहेत. पंचगंगा प्रदूषणासाठी केंद्र सरकारही मदत करेल, असेही त्यांनी सांगितले.

खंडपीठ प्रश्न मार्गी लावू

कोल्हापूरच्या खंडपीठाबाबत अ‍ॅडव्होकेट जनरल यांच्याशी बोललो आहे. मुख्य न्यायाधीशांशी भेटून हा प्रश्नही निकालात काढला जाईल, असेही त्यांनी सांगितले. इचलकरंजी शहरातील रस्त्यांसाठी 100 कोटींचा निधी नगरोत्थान योजनेतून दिला जाईल, त्यासाठी हात आखडता घेणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ज्या देशांनी महिलांना समानतेची वागणूक दिली, ते देश महासत्ता बनले. पूर्वी परिस्थिती वेगळी होती. परंतु, गेल्या पंधरा-वीस वर्षांत आपल्या देशातही महिला सर्व क्षेत्रांत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. देशाला महासत्ता बनविण्याची ताकद असणार्‍या महिलांच्या पाठीशी महायुतीचे सरकार ठामपणे उभा आहे.

आजच्या कार्यक्रमात ‘भक्ती आणि शक्ती’चा मिलाफ झाला आहे, असे सांगून खा. धैर्यशील माने म्हणाले, यंत्रमागधारकांना वीज दरामध्ये सवलत देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लावावा. कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड करणार्‍या बचत गटांना भरीव आर्थिक मदत करावी, तसेच शेतकर्‍यांची वाढीव पाणीपट्टी रद्द करावी. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे, अ‍ॅड. मनीषा कायंदे यांचीही भाषणे झाली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी कर्तृत्ववान महिलांचा तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, खा. संजय मंडलिक, आमदार प्रकाश आवाडे, आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अ‍ॅड. मनीषा कायंदे, जिल्हाप्रमुख रवींद्र माने, सुजित चव्हाण, समरजित घाटगे, अशोक स्वामी, माजी खासदार निवेदिता माने, रजनीताई मगदूम, राहुल आवाडे, मुरलीधर जाधव आदींसह मान्यवर उपस्थित होते. जिल्हा परिषद प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांनी आभार मानले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मजले येथील हेलिपॅडवर आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर, इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केले.
सभास्थळी येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. महिलांनी औक्षण केले. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह हसन मुश्रीफ, खा. धैर्यशील माने, उपसभापती नीलम गोर्‍हे ओपन जीपमधून व्यासपीठाकडे आले. व्यासपीठावर मान्यवर विराजमान होताच महिलांनी मोबाईल टॉर्च दाखवून त्यांचे स्वागत केले.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महिलांच्या उच्चांकी गर्दीचा उल्लेख करीत सभेतून एकही महिला उठली नाही, याची सर्वांनी नोंद घ्या. सरकारच्या कामाची महिलांकडून मिळालेली जणू ही पोेचपावती असल्याचे सांगितले. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी पंचगंगेच्या महापुरापेक्षाही महिलांची संख्या अधिक असल्याचे यावेळी सांगितले.

शाहूवाडीतील औद्योगिक वसाहतीच्या मंजुरीचे पत्र

शाहूवाडी तालुक्यातील डोणोली-आवळी येथील नव्या औद्योगिक वसाहतीला मंजुरी दिल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते खा. माने यांना या औद्योगिक वसाहतीच्या मंजुरीचे पत्रही देण्यात आले.

शहरातही बस तिकिटात महिलांना 50 टक्के सवलत

महिलांना एस.टी. तिकिटामध्ये 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. परंतु, शहरात ही सवलत दिली जात नसल्याचे मला सांगण्यात आले. आजपासून शहरातील प्रवास वाहतुकीमध्येदेखील महिलांना 50 टक्के सवलत देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले.

Back to top button