पन्हाळा : एखाद्या पथदिव्यावरील बल्ब बंद पडला तर तो तातडीने बदलला जात नाही. त्यासाठी नागरिकांना प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागतात किंवा वारंवार कॉल करावा लागतो. या रोज भेडसावणार्या समस्येवर उपाय म्हणून पन्हाळा नगर परिषदेने राज्यातील पहिली स्मार्ट पथदिवे प्रणाली कार्यान्वित केली आहे. एखाद्या विद्युत खांबावरील बल्ब बंद पडला किंवा कोणतीही तांत्रिक अडचण आली तर त्या खांबावर असणारा क्यूआर कोड कोणत्याही नागरिकाने स्कॅन केल्यास तत्काळ नगरपरिषदेत त्याची सूचना मिळणार आहे व चोवीस तासांत तो बल्ब बदलला जाणार आहे.
तीन हजार लोकसंख्या असणार्या पन्हाळगडावर 354 पथदिवे आहेत. या पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी नगर परिषदेकडे तांत्रिक कर्मचार्यांचा अभाव आहे. एखाद्या विद्युत खांबावरील बल्ब बंद पडला तर तो नगर परिषदेला समजत नव्हता. त्यामुळे तो बल्ब तातडीने बदलला जात नव्हता. या समस्येवर उपाय म्हणून गडावरील प्रत्येक पोलवर क्यूआर कोड लावण्यात आला आहे. हा क्यूआर कोड नागरिकांनी आपल्या मोबाईलवरून स्कॅन केल्यास त्या पोलची पूर्ण माहिती मोबाईलवर दिसते. त्यामध्ये नागरिक संबंधित खांबांची तक्रार नोंदवू शकतात. ही तक्रार नगर परिषदेच्या कर्मचार्यांच्या मोबाईलवर जाईल व जर त्या ठिकाणचा बल्ब बंद पडला असेल तर तातडीने बदलला जाईल. 24 तासांत जर तो बल्ब बदलला नाहीत तर याबाबत मुख्याधिकारी यांच्या मेलवर तश्या सूचना जातील व पुढील कार्यवाही होईल, अशी माहिती प्रशासकीय अधिकारी अमित माने व नंदकुमार कांबळे यांनी दिली.
तांत्रिक कर्मचार्यांचा अभाव हा नेहमी भेडसावणारा प्रश्न होता. यावर कायमस्वरूपी उपाय करणे गरजेचे होते. या प्रणालीमुळे पथदिवे चालू-बंद करणारे अतांत्रिक कर्मचारी सुरक्षित राहणार आहेत. ही प्रणाली कार्यान्वित केल्याने प्रशासनास पथदिवे देखभाल दुरुस्ती नियोजनबद्ध स्वरूपात करता येणार आहे.
– चेतनकुमार माळी, मुख्याधिकारी नगरपरिषद पन्हाळा