परळीतील प्रवीण वाघमारेंच्या कल्पनेतून सजले अयोध्येचे विमानतळ; पंतप्रधानांकडून कौतूक | पुढारी

परळीतील प्रवीण वाघमारेंच्या कल्पनेतून सजले अयोध्येचे विमानतळ; पंतप्रधानांकडून कौतूक

परळी वैजनाथ : प्रा. रवींद्र जोशी : अयोध्या येथील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि या विमानतळातील कलात्मक चित्रकला संपूर्ण भारतीय संस्कृतीचे मिश्रण असलेली चित्रशिल्पे सर्वांनाच आकर्षित करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच मान्यवरांनी या चित्रांचे कौतुक केले असून परळीचे आर्टिस्ट प्रवीण वाघमारे यांच्या कल्पनेतून चित्रे साकारली गेली आहेत.

संबंधित बातम्या : 

भारतीय पौराणिक कथांनी भरलेल्या अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील उपक्रमांनी अयोध्या विमानतळाचे उत्कृष्ट सांस्कृतिक आणि आध्यात्मिक केंद्रामध्ये रूपांतर झाले आहे. अयोध्या विमानतळ भारतीय मंदिरांच्या पारंपरिक सौंदर्यासह आधुनिक तंत्रज्ञान आणि कला या मिश्रणाचे प्रतीक बनले आहे. या विमानतळावर यात्रेकरूंना एक पवित्र, मंगलमय अनुभव मिळतो. विमानतळावर अनेक कलात्मक चित्र विशेष शैलीत रेखाटण्यात आलेली आहेत. प्रवीण वाघमारे, विवेक सोनवणे, आनंद सोनवणे आणि सचिन कलुस्कर यांनी ही संपूर्ण चित्र दालने साकारली आहेत. याठिकाणी दोन चित्तवेधक कॅनव्हास, कलमकारी आणि पट्टाचित्र शैलींचे मिश्रण ठळकपणे दिसते. पहिला प्रवेशद्वारावरील ३०० फूट लांबीचा कॅनव्हास, जो १४ विभागांमध्ये विभागलेला आहे, तो भगवान रामाच्या १४ वर्षांच्या वनवासाचे प्रतीक आहे.

दुसरा कॅनव्हास हनुमान चालिसावरून हनुमानाच्या जीवनाचा उलगडा करतो. १६ विभागांमध्ये पसरलेल्या या चित्रांमधून हनुमानाच्या प्रवासाची भावनिक सखोलता दर्शविली आहे, जी भक्तांना भावते. कलमकारी आणि पट्टचित्र तंत्रे बघताना चैतन्य प्रदान करतात. ही दृश्य कथा तयार करतात. भारतीय अध्यात्माचा अविभाज्य भाग असलेल्या कथा कथन करणारी ही स्थापत्य दृश्ये भारतीय पौराणिक कथांचे संदेशवाहक म्हणून काम करतात. याठिकाणी पर्यटक केवळ स्थापत्यकलेच्या भव्यतेतून जात नाहीत तर या अभिव्यक्तींच्या आध्यात्मिक तेजात बुडून जातात.

विमानतळाच्या या कामाची संकल्पना डिझायनर, कलाकार प्रवीण वाघमारे यांची आहे. प्रवीण वाघमारे, विवेक सोनावणे आणि आनंद सोनावणे यांनी हे काम तडीस नेले. या तिघांनीही बडोदा येथील एमएसयू (MSU) विद्यापीठ येथे ललितकला विद्याशाखेत (फाईन आर्ट) पदव्यूत्तर शिक्षण घेतले आहे. हा प्रकल्प बडोदा येथील सचिन कलुस्कर यांनी हाताळला होता. विमानतळाच्या या कामाची संकल्पना डिझाईन करणारे कलाकार प्रवीण वाघमारे हे परळीचे आहेत.

याबाबत प्रवीण वाघमारे यांनी सांगितले की, कलाकृतींमध्ये पारंपरिक कलमकारी आणि पट्टचित्र प्रकारांचा संगम आहे. आम्हाला देशाच्या विविध भागांतील पारंपरिक कलाकृती एकत्र आणायच्या होत्या. हे साकारलेले चित्ररुप शतकानुशतके जुने आहे. या कलाकृतींमध्ये भगवान श्रीरामाच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतचे जीवन चित्रित करण्यात आले आहे. आम्ही डेहराडून आणि सुरत विमानतळांवर याआधी चित्रकला सादर केली असल्याने अयोध्येतील विमानतळावर काम करण्यासाठी आमची निवड करण्यात आली. सुरुवातीला आम्ही काही संकल्पना तयार केल्या, ज्यातून आत्ताच्या या संकल्पनांची निवड करण्यात आली. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चेच्या अनेक बैठक मालिकेनंतर आत्ताचे हे नयनरम्य व आकर्षक विमानतळ साकारले आहे.

कोण आहेत प्रविण वाघमारे?

परळी वैजनाथ येथील प्रिंटिंग क्षेत्रात बुक बाइडिंग व अन्य कामे करणारे महादेव वाघमारे यांचे प्रवीण वाघमारे हे चिरंजीव आहेत. मूळ परळी वैजनाथ येथीलच असलेले वाघमारे कुटुंब हे काही वर्षांपूर्वी वैद्यनाथ मंदिर परिसरातील पेठ गल्ली भागात राहत होते. सध्या परळीतील शंकर-पार्वती नगर येथे त्यांचे घर आहे. प्रवीण वाघमारे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण परळीतील जुन्या गाव भागात असलेल्या वैद्यनाथ विद्यालयात झालेले आहे. तर बारावी पर्यंतचे शिक्षण त्यांनी परळीच्या वैद्यनाथ महाविद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर मुंबई येथे जे जे स्कूल ऑफ आर्ट्स येथून चित्रकलेचे शिक्षण पूर्ण केले. फाईन आर्ट मध्ये एम एस यु विद्यापीठ बडोदा येथून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. फाईन आर्ट (ललित विद्या) कलेतील देशातील उत्कृष्ट आर्टिस्ट म्हणून त्यांची ओळख आहे.

हेही वाचा : 

Back to top button