Ram Mandir inauguration : प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे पहिले निमंत्रण ऋतंभरा यांना, कोण आहेत त्या? | पुढारी

Ram Mandir inauguration : प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे पहिले निमंत्रण ऋतंभरा यांना, कोण आहेत त्या?

अयोध्या; वृत्तसंस्था : प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची (Ram Mandir Inauguration) सर्वात पहिली निमंत्रण पत्रिका साध्वी ऋतंभरा (Sadhvi Ritambhara) यांना देण्यात आली आहे. आवेशपूर्ण आणि खर्जा आवाजातील त्यांच्या भाषणांमुळे रामभक्त आणि कारसेवकांना आंदोलनासाठी मोठी ऊर्जा मिळाली होती.

सूर्य प्रकाशाला सोडचिठ्ठी देईल, चंद्र आपली शीतलता सोडेल, समुद्रही आपल्या मर्यादा ओलांडेल; मात्र अयोध्येतील राम मंदिर जगातील कोणतीच शक्ती रोखू शकणार नाही, अशा शब्दात ऋतंभरा यांनी राम मंदिराच्या आंदोलनामध्ये आपल्या भाषणांनी उत्साह निर्माण केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यांच्या आदेशानुसार झालेल्या गोळीबारात कारसेवकांचा मृत्यू झाला होता. त्याप्रसंगी तर त्यांनी युद्धजन्य परिस्थितीसारखे तडाखेबंद भाषण केले होते. कारसेवकांच्या अकाली मृत्यूंचा वणवा प्रत्येकाच्या रक्तात अंगार बनून पेटून उठेल, अशा शब्दात त्यांनी मुलायमसिंह यांच्यावर जोरदार हल्ला चढविला होता. (Ram Mandir Inauguration)

पंजाबमधील लुधियाना शहरात त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव निशा आहे. वयाच्या 16 व्या वर्षीच त्यांनी संन्यासदीक्षा घेतली होती. हरिद्वारातील गुरू परमानंद यांनी त्यांचे नाव ‘ऋतंभरा’ असे ठेवले. आजही त्यांचा आवाज करारी आहे. त्यांच्या भाषणाची भुरळ आजही कायम आहे. दिल्लीतील सभेत त्यांनी राम मंदिरास विरोध करणार्‍यांची तुलना श्वानाशी केली होती. तर मुलायमसिंह यांच्यावर खुनी, तृतीयपंथी असल्याची टीका केली होती. 1980 च्या दशकापासून त्या राम मंदिर आंदोलनात सक्रिय राहिल्या आहेत. बाबरी विध्वंसप्रकरणी चिथावणखोर भाषणाचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

त्यांच्या कविताही प्रसिद्ध आहेत. हिंदू असो वा मुस्लिम; ज्याचे देशावर प्रेम नाही, त्याला देशात वास्तव्य करण्याचा अधिकार नसल्याचे वक्तव्यही त्यांनी अलीकडेच केले होते. वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांना तुरुंगवासाची शिक्षाही झाली होती.

Back to top button