नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आमच्याकडे दोनशेच्यावर आमदार आहेत. त्यामुळे आमदार अपात्र प्रकरणाचा निर्णय काहीही आला तरी राज्यातील सरकारला कोणताही धोका निर्माण होणार नाही. शिवसेना आमदार अपात्र ठरले तरी, आमच्याकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे सरकार स्थिर राहणार आहे, असा दावा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केला आहे. शिंदे यांची बाजू भक्कम आहे. पक्षाचे सर्वाधिक आमदार, खासदार, पदाधिकारी त्यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे निर्णय सकारात्मकच लागेल, असा आशावादही महाजन यांनी व्यक्त केला.
तहसीलदारपदाचा राजीनामा देऊन राजकारणात उतरलेल्या राजश्री अहिरराव तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाशी संबंधित सोनालीराजे पवार व काँग्रेसच्या माजी नगरसेविका अश्विनी बोरस्ते आदींसह विविध पक्षांतील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि.९) भाजपच्या 'वसंतस्मृती' कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आमदार अपात्रता प्रकरणाच्या बुधवारच्या संभाव्य निकालाविषयी महाजन यांनी भाष्य केले.
महाजन म्हणाले की, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण ही न्यायालयीन बाब आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणीसाठी आले आहे. या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष निकाल देणार आहेत. आता ते जो निर्णय देणार असतील तो सगळ्यांना मान्य करावा लागणार आहे. परंतु विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला हा निर्णय संपूर्ण देशासाठी दिशादर्शक असेल आणि महत्त्वाचा असणार आहे, असे नमूद करत उद्धव ठाकरे व शरद पवार हे न्यायव्यवस्थेवर टोकाला जाऊन टीका करत आहेत. त्यांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही, असा आरोपही महाजन यांनी केला.
उमेदवारीचे आश्वासन नाही
भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राजश्री अहिरराव या देवळाली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. यापूर्वीच माजी मंत्री बबन घोलप यांची कन्या तनुश्री घोलप यांनीदेखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अहिरराव यांना प्रवेश दिल्याने देवळालीची जागा भाजप लढवणार का, या प्रश्नाला उत्तर देताना देवळाली विधानसभेसह अन्य विधानसभा मतदारसंघासाठी कुठलीही कमिटमेंट देण्यात आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुळात जे प्रवेश करत आहे ते उमेदवारीसाठी प्रवेश करत नाहीत. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास असल्याने त्यातून हे प्रवेश होत आहेत. या माध्यमातून भाजपदेखील मोठा होत आहे. अहिरराव यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन राष्ट्रवादी काँग्रेसवर कुठलेही दडपण आणण्याचे काहीच कारण नाही. महायुतीमध्ये एकजूट असून, जागावाटपात जो काय निर्णय व्हायचा तो होईल, असे स्पष्टीकरणही महाजन यांनी दिले.
पंधरा दिवसांत मोठा राजकीय भूकंप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षाशी लोक जोडले जात आहेत. राज्यातील सर्वच पक्षांतील प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी भाजपमध्ये येत आहेत. भारतीय जनता पक्षावर विश्वास वाढत चालल्याचा हा परिणाम आहे, असे नमूद करत येत्या १५ दिवसांत राज्यातील राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याचा दावाही महाजन यांनी केला. महाविकास आघाडीची दयनीय अवस्था झाली आहे. नेतृत्वहीन व दिशाहीन असल्याने या पक्षाचे सर्व लोक भाजपकडे आकर्षित झाले आहेत, असेही ते म्हणाले.
कांदा उत्पादकांना विश्वासात घेऊ
कांदा उत्पादकांनी दिलेल्या इशाऱ्यावरही महाजन यांनी भाष्य केले. जिल्ह्यातील कांदा उत्पादक अडचणीत आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी आहे हे मान्य आहे. त्यांच्याशी आम्ही चर्चा करू. त्यांच्या अडचणी सोडवू. कांद्यासंदर्भात उद्यापर्यंत निर्णय होईल. त्यातून शेतकऱ्यांचे समाधान होईल, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.
हेही वाचा :