Cold Wave : देशात थंडीचा कडाका वाढला; उत्तरेकडील राज्यात पावसाची शक्यता | पुढारी

 Cold Wave : देशात थंडीचा कडाका वाढला; उत्तरेकडील राज्यात पावसाची शक्यता

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशात विविध राज्यांमध्ये थंडी (Cold Wave) वाढत आहे. या पार्श्वभूमीवर हिमाचलमध्ये बर्फवृष्टी तर मध्य प्रदेश, पंजाब आणि हरियाणातील काही शहरांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. राजस्थान आणि बिहारमध्ये थंडीचा ऑरेंज अलर्ट आहे. तसेच वाढत्या थंडीमुळे देशातील १९ राज्यांमध्ये दाट धुके आहेत.
धुक्यामुळे मध्य प्रदेशातील भोपाळ आणि काही भागात मंगळवारी दृश्यमानता १० मीटरपर्यंत कमी झाली होती. उत्तर प्रदेशातील बरेली, वाराणसी आणि गोरखपूर या शहरांमध्येही पहाटे दृश्यमानता अत्यंत कमी होती. राजस्थानमध्येही काही भागात पहाटे दृश्यमानता ५० मीटर एवढी नोंदवण्यात आली. पुढचे दोन दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. या हवामानाचा परिणाम रेल्वेसह विमानसेवेवर देखील होत आहे. Cold Wave
हवामान विभागाने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, झारखंड आणि हरियाणामधील काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच हिमाचल प्रदेशात हलका पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता आहे. पूर्व गुजरात, पूर्व राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागासह तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रात हलका पाऊस पडू शकतो. दक्षिण भारतातील राज्यांमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये पावसाचा इशारा जारी केला आहे. पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, झारखंड, ओडिशा आणि ईशान्य भारतात दाट धुकेही पडू शकते.
वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. वाहने हळू चालवा आणि धुक्यामध्ये दिसू शकतील असे दिवे वापरा. प्रवासाच्या वेळापत्रकासाठी संबंधित एअरलाइन्स, रेल्वे यांच्या संपर्कात राहवे असेही यात सांगण्यात आले. वाढलेल्या धुक्याचा फटका रेल्वे गाड्यांनाही बसला. सोमवारी दिल्लीहून उत्तर प्रदेशात येणाऱ्या ४९ गाड्या उशिराने धावल्या. काही विमाने देखील उशिरा उड्डाण करत आहेत. दरम्यान, पुढचे २ दिवस उत्तर प्रदेशात पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा

Back to top button