Maharashtra Winter Session 2023 : ‘शेतकऱ्यांची कर्जमाफी करा’, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक | पुढारी

Maharashtra Winter Session 2023 : 'शेतकऱ्यांची कर्जमाफी करा', अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कापूस सोयाबीनला भाव नाही. शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. अश्या स्थितीत सरकार केवळ पंचनामे करत आहे. आम्हाला घोषणा नकोत तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला पाहिजे, अशी मागणी करत शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

आजपासून राज्यविधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू झाले. या अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह विरोधकांनी विधीमंडळाचा परिसर दणाणून सोडला. सरकार विरुद्ध हल्लाबोल करताना विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, बळीराजा अवकाळीने त्रस्त असताना सरकार मात्र जाहिरातीत व्यस्त आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असंवेदनशील असून त्यांच्याशी निष्ठूर सारखे वागत आहे. सरकारच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध ताशेरे ओढत विधीमंडळाच्या पायऱ्यांवर वडेट्टीवार यांनी सरकारचा जोरदार निषेध व्यक्त केला. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधी घोषणाबाजी देखील केली.

याप्रसंगी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, वर्षा गायकवाड, जयंत पाटील, अनिल देशमुख, सुनील प्रभू, यांच्यासह महाविकास आघाडीतील आमदारांनी हातात निषेधाचे काळे फलक हाती घेत खोके सरकार हाय हाय, शेतकरी झाला कासावीस खोके सरकार ४२०, अशी घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या आमदारांकडून शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध नोंदवताना विरोधक आक्रमक झाले होते.

शेडनेट, पशुधन नुकसानीसाठी विम्याची तरतूद करावी : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

नागपूर : राज्यात मागील आठवड्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे २२ जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टर क्षेत्राचं मोठया प्रमाणात नुकसान झालं आहे. या नुकसानात शेडनेट व पशुधनाचेही मोठया प्रमाणात हानी झाली आहे. यासाठी कोणत्याही विम्याची तरतूद नाही. त्यामुळे शेडनेट व पशुधन नुकसानीसाठी विम्याची तरतूद करावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात केली.

अवकाळी व गारपीट झाल्यावर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं, अस अभिवचन दिलं होतं. मात्र पोखरा योजनेतून उभारल्या जात असलेल्या शेडनेटसाठी कोणतीही मदत दिली जात नसल्याकडे दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. शेडनेट उभारणीसाठी बँक व कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. मात्र वादळी वाऱ्यात हे शेडनेट वाहून गेल्यावर त्याच्या नुकसान भरपाईसाठी कोणताही विमा नाही. त्यामुळे शेडनेट नुकसान भरपाईसाठी येत्या काळात मदत देण्याची बजेटमध्ये तरतूद करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात केली. तशाच प्रकारची स्थिती ही पशुधन नुकसानी बाबतही आहे. त्यामुळे त्यासाठी नुकसान भरपाईची येणाऱ्या काळात सरकारने व्यवस्था करावी, अशी मागणी दानवे यांनी सभागृहात लावून धरली. त्यावर उपमुख्यमंत्री यांनी याबाबत लाभार्थ्यांना विम्याची योजना करता येईल, याबाबत मुख्यमंत्री यांनी निर्देश दिले असल्याची माहिती दिली.

हेही वाचा : 

Back to top button