केजरीवाल आलेच नाहीत तर मुख्यमंत्री मान न भेटताच निघून गेले; नागपुरातील कार्यकर्त्यांचा हिरमोड | पुढारी

केजरीवाल आलेच नाहीत तर मुख्यमंत्री मान न भेटताच निघून गेले; नागपुरातील कार्यकर्त्यांचा हिरमोड

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : शेजारच्या छत्तीसगड, मध्यप्रदेशमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सध्या दिवाळीच्या फटाक्यांसोबतच राजकीयदृष्ट्या रणधुमाळी सुरू आहे. मंगळवारी (दि.१४) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान नागपुरात येणार असल्याने कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली होती. मात्र मुख्यमंत्री केजरीवाल आलेच नाहीत तर मुख्यमंत्री मान न भेटताच निघून गेले त्यामुळे ‘आप’ च्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.

मुख्यमंत्री केजरीवाल व मुख्यमंत्री मान यांच्या स्वागतासाठी आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी नागपूरच्या विमानतळावर मोठी गर्दी केली होती. मंगळवारी दुपारी १२ वाजता त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन होणार, कार्यकर्त्यांशी संवाद साधून ते पुढे जाणार असल्याचे सांगण्यात आल्याने तासभर आधीच कार्यकर्ते पोहोचले. मात्र दुपारी एक वाजत आला, तरी विमानतळावर कोणाचाच पत्ता नाही. त्यामुळे कार्यकर्ते निराश झाले. अखेर काही वेळाने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडक सुरक्षा व्यवस्थेत विमानतळाबाहेर आले. कार्यकर्त्यांनी त्यांना हात हलवून अभिवादन करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते लगेच वाहनात बसून आपल्या पुढील प्रवासाला निघून गेले. कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ हातातच राहिले.  मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल का आले नाहीत, आम्हाला संवाद साधायचा होता. नागपुरातील अनेक प्रश्न त्यांच्यापुढे मांडायचे होते, असे मत यावेळी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा : 

Back to top button