Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत ४८ जणांचे बलिदान, याला जबाबदार कोण? : विनोद पाटील

Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत ४८ जणांचे बलिदान, याला जबाबदार कोण? : विनोद पाटील

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलनात सक्रिय असलेले सुनील बाबुराव कावळे (वय ४५) यांनी आज बांद्रा पूर्व मुंबईत जीवन संपवले. सुनील कावळे हे जालना जिल्ह्यातील चिकनगाव, (ता. अंबड) येथील आहेत. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेची नोंद खेरवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे. या घटनेनंतर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारला कधी जाग येणार असा सवाल केला. मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत ४८ जणांनी बलिदान दिले आहे, याला जबाबदार कोण, असे विनोद पाटील यांनी म्हटले आहे. (Maratha Reservation)

Maratha Reservation : याला जबाबदार कोण?

आज (दि.१९) सकाळी जालना जिल्ह्यातील चिकनगाव, (ता. अंबड) येथील सुनील बाबुराव कावळे (वय ४५) यांनी मराठा आरक्षणासाठी आज बांद्रा पूर्व मुंबईत जीवन संपवले. हा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनाकरिता मराठा समाजातील लोकांनी २४ ऑक्टोबरला मुंबईमध्ये एकत्र येण्याचे आवाहन केले होते. तसेच चिठ्ठीच्या शेवटी त्यांनी सर्वांची माफी मागितली आहे. त्यांच्या पाश्चात आई – वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असून मुलीचे दोन वर्षपूर्वी लग्न झाले आहे. त्यांना अवघी एक एकर जमीन आहे. त्यावर उपजीविका भागत नसल्याने त्यांनी छत्रपती संभाजीनगर शहर गाठले होते. सुनील कावळे हे रिक्षाचालक होते. उद्या सकाळी (दि.२०) मुकुंदवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार, अशी माहिती विनोद पाटील आणि त्यांचे जावई यांनी दिली.

'अन्यथा उद्रेक अटळ', विनोद पाटील यांचा सरकारला इशारा

दरम्यान, सुनील कावळे यांनी जीवन संपवल्याच्या घटनेवर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी, 'खचून जाऊ नका. लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊच नका' असे आवाहन मराठा बांधवांना केले आहे. त्यांनी याबाबत X वर पोस्ट केली आहे. "माझ्या मराठा बांधवांनो, आपल्या मागण्या मंजूर करून घेण्याचा हा योग्य मार्ग नाही. काळाच्या छाताडावर बसून अनेक संग्राम आपल्या या लढवय्या जातीने इतिहासात जिंकले आहेत. खचून जाऊ नका. लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊच नका! सरकारला विनंती की, यापुढे हा विषय अधिक गंभीर होत जाणार आहे. मराठा आरक्षण हा विषय आमच्या जगण्याशी संबंधित आहे, हे आता तरी मान्य करा. एवढे बळी गेल्यावरही तुम्हाला जाग येत नाही."मराठा युवकांनी जीवन संपवू नये, यासाठी सरकारने तात्काळ पाऊले उचलावी. नाहीतर उद्रेक अटळ आहे. असा इशारा विनोद पाटील यांनी दिला आहे. त्यांनी सुनील कावळे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news