नाशिक : पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाअभावी वारकऱ्यांचे हाल | पुढारी

नाशिक : पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाअभावी वारकऱ्यांचे हाल

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा

येथून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ यांची पालखी शुक्रवारी (दि. 2) पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहे. त्यासाठी वारकरी मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले आहेत. जिल्हा प्रशासनाने नियोजन निधीमधून ३० लाख रुपये जाहीर केले आहेत. असे असून त्र्यंबकेश्वर येथे आलेले वारकरी विविध असुविधांचा सामना करत आहेत.

सुमारे 450 किमी अंतर आणि 27 मुक्कामांच्या ठिकाणी पायी प्रवासात त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करण्याच्या नावाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका होत आहेत. विश्वस्त मंडळी थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटुन साकडे घालत आहेत. मात्र त्याच वेळेस त्र्यंबकेश्वरमध्ये दिवसाला पाच हजार वारकरी भाविक मुक्कामाला येत आहेत. संत निवृत्तिनाथ मंदिर परिसरात शेकडो वाहने उभी राहिलेली दिसतात. रस्त्यावर चूल मांडून स्वयंपाक करणारे, तेथेच पंगत धरणारे आणि रात्रीला रस्त्याच्या कडेला मुक्काम ठोकणारे वारकरी हजारोंच्या संख्येने आहेत. यातील बहुतांश भाविक नांदेड, परभणी भागातून येत असतात. पालखीला निरोप देतात व त्यानंतर पुढच्या देवस्थानांना जातात. दशमीला आळंदी येथील माउलींच्या पालखी प्रस्थानाला पोहोचतात आणि तेथून ते आळंदी पालखी सोहळ्यात सहभागी होतात.

त्र्यंबकेश्वर येथे वारकरी भक्तांचा हा ओघ आणखी आठ दिवस राहणार असून त्यांना मुक्कामाला, स्वयंपाकाला जागा नाही. पिण्यासाठी पाण्याची टाकी आहे पण पाणी नाही. मात्र याकडे त्र्यंबक नगर परिषद आणि संत निवृत्तिनाथ देवस्थान ट्रस्ट या दोन्ही संस्थांनी लक्ष दिलेले नाही. संत निवृत्तिनाथ मंदिर परिसर विकास आराखड्याचे काम सुरू आहे. त्यासाठी येथील टॉयलेट तोडण्यात आले आहेत. सिंहस्थ 2015 मध्ये तयार करण्यात आलेली पाण्याची टाकी तोडण्यात आली आहे. संत निवृत्तिनाथ मंदिराच्या बाजूला अटल आखाड्याची जमीन आहे. तेथील ठाणापती महंत उदयगिरी महाराज यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. परिसरातील ओहोळ, नाले यांना हागणदारीचे स्वरूप आले आहे. येथे दुर्गंधी निर्माण झाली आहे आणि रहिवाशांचे व भक्तांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

शेकडो वर्षांपासून दरवर्षी पालखी पंढरपूरला जात असते. यावर्षी त्यासाठी गाजावाजा केला जात आहे. मात्र, येथे आलेल्या वारकरी भाविकांना स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, साफसफाई यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी मंदिर ट्रस्ट आणि नगरपालिका यांनी कोणतीही काळजी घेतलेली नाही. त्यामुळे पहिल्यांदाच अशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे. – महंत उदयगिरी महाराज, अटल आखाडा, त्र्यंबकेश्वर

हेही वाचा:

Back to top button