नगर: अग्निशमन विभागाला मिळणार बळ, पंधरा दिवसांत 40 कर्मचारी, नवीन बंबही होणार दाखल | पुढारी

नगर: अग्निशमन विभागाला मिळणार बळ, पंधरा दिवसांत 40 कर्मचारी, नवीन बंबही होणार दाखल

नगर, पुढारी वृत्तसेवा: महापालिका अग्निशमन विभागाची भिस्त अवघ्या 17 कर्मचार्‍यांवर आहे. त्यातील दोन कर्मचारी उद्या सेवानिवृत्त होणार आहेत. परंतु, केडगाव औद्योगिक वसाहतीतील आगीच्या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या महापालिकेने 15 दिवसांत बाह्यसंस्थेमार्फत 40 कर्मचारी भरतीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानंतर अग्निशमन विभाग पूर्ण क्षमतेने कार्यरत होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

एकेकाळी 217 एकर जागेत वसलेले नगर शहर आता 22 हजार एकरवर विस्तारले आहे. तर, लोकसंख्याही साडेपाच लाखाच्या पुढे गेली आहे. तर, मालमत्तांची संख्याही एक लाखाच्या पुढे आहे. त्यामुळे शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्न वारंवार निर्माण होतो. नगर शहरात अग्निशमन विभागाचे तीन कार्यालय आहेत. पण त्या कार्यालयात कर्मचारीच नसल्याने सावेडी व केडगाव कार्यालय बंद ठेवावे लागत आहे. त्यात तीन अग्निशमन बंबापैकी अवघा एक बंब सुरस्थित आहे. त्यातील दोन बंब दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये दाखल आहेत. अवघ्या 17 कर्मचार्‍यांवर अग्निशमन विभागाची भिस्त आहे. याबाबत दै. पुढारीने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. दमर्‍यान, आठ दिवसांपूर्वी केडगाव औद्योगिक वसाहतील एका कंपनीला आग लागली. त्यामुळे अग्निशमन विभागाची वस्तुस्थिती समोर आली. महापालिकास्तरावर तत्काळ बाह्यसंस्थेमार्फत कर्मचारी हालचाली सुरू झाल्या. संबंधित संस्थेकडे करारनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या आठ दिवसांत अग्निशमन विभागाला प्रशिक्षित 40 कर्मचारी मिळणार आहेत. त्यातील सात कर्मचारी चालक असणार आहेत. तर, दुरुस्तीसाठी दाखल केलेले बंबही येत्या दोन दिवसांत पुन्हा महापालिकेच्या सेवेत रुजू होतील. तसेच, नवीन अत्याधुनिक अग्निशमन बंबही येत्या आठ दिवसांत येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अग्निशमन विभाग कार्यक्षम होणार आहे.

बाह्य संस्थेमार्फत येत्या आठ दिवसांत 40 कर्मचारी मिळणार आहेत. त्यानंतर सावेडी, माळीवाडा व केडगाव असे तीनही कार्यालय सुरू होतील.
– शंकर मिसाळ, अग्निशमन विभागप्रमुख

Back to top button