दूधगंगेतून एक थेंबही पाणी देणार नाही : राजगोंडा पाटील

दत्तवाड, पुढारी वृतसेवा : इचलकरंजी महापालिकेचे माजी नगरसेवक पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांनी दूधगंगा डाव्या कालव्यामधून घोसरवाडपासून तीन किलोमीटर बंद जलवाहिनीतून घोसरवाड येथील दूधगंगा नदीमध्ये पाणी सोडावे. असे केल्यास शिरोळ तालुक्यातील घोसरवाड, दत्तवाड, टाकळीवाडी, टाकळी, दानवाड या पाच गावांना उन्हाळ्यात भेडसावणारा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. यामुळे सुळकुड योजनेला होणारा विरोध कमी होईल यासाठी महापालिकेने हा प्रस्ताव सादर करावा ही भूमिका मांडली.
पण या सगळ्या शेखचिल्लीच्या गोष्टी असून बंद पाईपलाईन मधून पाणी आणून नदीत सोडणे व यासाठी महापालिकेने आणखी वेगळे प्रस्ताव पाठवणे या कोणत्याच गोष्टी शक्य नाहीत. त्यामुळे या विषयावर त्यांनी पोकळ बाता मारू नयेत. आम्ही आमच्या हक्काचं पाणी देणार नाही या भूमिकेवर ठाम आहे, असे दत्तवाडचे माजी उपसरपंच व भाजपा शिरोळ तालुका उपाध्यक्ष राजगोंडा पाटील म्हणाले.
दूधगंगा नदीचा पाणी प्रश्न हा फक्त पाच गावांचा नसून नऊ गावांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतकऱ्यांच्या शेतीसाठीचा मोठा प्रश्न आहे. यावर्षी उन्हाळ्यात दूधगंगा नदी काही काळ वगळता कोरडीच राहिली आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिके वाळून गेली आहेत. हक्काचं सोयाबीनचे पीक ही करता आलं नाही तसेच बारमाही वाहणारी नदी उशाला असून पिण्याचा पाण्याचाही मोठा गंभीर प्रश्न यावेळी निर्माण झाला.
इचलकरंजी, कोल्हापूरला किंवा अन्य ठिकाणी पाणी नेण्याआधीच ही परिस्थिती असेल तर अन्य ठिकाणी पाणी नेल्यावर दूधगंगा नदी काठची अवस्था दुष्काळी मराठवाड्यासारखी होईल यात शंकाच नाही .त्यामुळे शिरोळ तालुक्यातील कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी इचलकरंजीच्या नेत्यांसोबत चर्चा करू नये. उलट शिरोळ तालुक्यातील दूधगंगा काठच्या या नऊ गावाच्या शेतकऱ्यांच्या, ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून या योजनेला विरोध करावा. अन्यथा या नऊ गावातील ग्रामस्थ, शेतकरी हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाहीत असा इशाराही त्यांनी दिला.
दूधगंगेतून सूळकूड अथवा अन्य कुठूनही पाणी कुठेही देणार नाही या मतावर दुधगंगा बचाव कृती समिती सह या नऊ गावातील ग्रामस्थ शेतकरी ठाम आहेत व ठामच राहतील अशी ठोस भूमिका पाटील यांनी व्यक्त केली.
-हेही वाचा
नगर: अग्निशमन विभागाला मिळणार बळ, पंधरा दिवसांत 40 कर्मचारी, नवीन बंबही होणार दाखल
पाठदुखीमुळे हैराण आहात, मग हे वाचाच..!
Stock Market Closing | शेअर बाजार सुस्त, सेन्सेक्स १९३ अंकांनी घसरून बंद, निफ्टी १८,५०० च्या खाली