IPL 2023 : यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये ‘हे’ १५ क्षण ठरले खास, जाणून घ्या सविस्तर | पुढारी

IPL 2023 : यंदाच्या 'आयपीएल'मध्ये 'हे' १५ क्षण ठरले खास, जाणून घ्या सविस्तर

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2023 चा फायनल सामना सोमवारी झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने गुजरात टायटन्सचा पाच गडी राखून पराभव करत विजेतेपदावर कब्जा केला. या हंगामात क्रिकेटप्रेमींना अनेक थरारक सामन्‍यांचा आनंद लुटला. ५९ दिवस चाललेल्या या स्पर्धेत एकूण ७४ सामने खेळवले गेले. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यापर्यंत प्लेऑफमधील चार संघांचा निर्णय होऊ शकला नाही. रॉयल चॅलेंजर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील साखळी फेरीच्या सतराव्या सामन्यानंतर  प्लेऑफचे चार संघ अंतिम झाले. गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्ज, लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई या संघांनी अंतिम फेरी गाठली. आता चेन्नईचा संघ विक्रमी पाचव्यांदा चॅम्पियन बनला आहे. या सीझनमध्ये ५९ दिवसांत अनेक खास क्षण पाहायला मिळाले. बॉलीवूडमधील दिग्गज अरिजित सिंगने उद्घाटन समारंभात महेंद्रसिंह धोनीच्या पायाला स्पर्श केला, यानंतर आणखी अनेक खास क्षण पाहायला मिळाले. जाणून घेवूया खास क्षणांविषयी…

अरिजित सिंगने धोनीना केले चरणस्पर्श

एमएस धोनी जगातील  लाेकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे.  स्टार गायक अरिजित सिंग देखील अनुभवी विकेटकीपर आणि फलंदाजाचा मोठा चाहता आहे. 31 मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर IPL 2023 च्या उद्घाटन समारंभातील दोघांनी एक भावनिक क्षण शेअर केला. फोटोमध्ये अरिजित धोनीच्या पायाला स्पर्श करताना दिसला. उद्घाटन समारंभात अरिजितने त्याच्या गाण्यांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. त्याच्यासोबत अभिनेत्री रश्मिका आणि तमन्ना भाटिया यांनी देखील हिट गाणी सादर केली. त्यानंतर तिघेही ट्रॉफीच्या अनावरणासाठी मंचावर उपस्थित होते. त्यावेळी दोन्ही संघांच्या कर्णधारांना बोलावण्यात आले. प्रथम चेन्नईचा कर्णधार धोनी स्टेजवर पोहोचला. अरिजितजवळ पोहोचताच अरिजितने त्याच्या पायाला स्पर्श केला. त्याच्या स्टाईलने चाहत्यांची मने जिंकली. आयपीएल प्रारंभीचा हा क्षण स्‍मरणीय ठरला.

कोहली-गंभीर आणि नवीन मैदानावर भिडले

आयपीएल हंगामातील लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स सामन्यातील हे संपूर्ण प्रकरणआहे. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने १२६ धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना लखनौच्या डावाच्या सतराव्‍या षटकात विराट स्टंपच्या मागून धावत आला आणि लखनऊच्या नवीन-उल-हककडे इशारा करत काही हावभाव केला यानंतर संपूर्ण प्रकरणाला सुरुवात झाली. अफगाणिस्तानचा नवीनही त्याच्या जवळ आला आणि दोघांमध्ये वाद सुरू झाला. बाकीच्या खेळाडूंनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोहली आणि अमित मिश्रा यांच्यातही वाद झाला.

बंगळुरूच्या विजयानंतर दोन्ही संघांचे खेळाडू हस्तांदोलन करत असताना कोहलीने नवीनला काहीतरी सांगितले. कोहली बाेलत असतानाच नवीनने त्‍याला प्रत्‍युत्तर दिले. दोघांमध्ये वादावादी झाली.  कोहली मैदानाबाहेर जात असताना तो लखनऊच्या काइल मेयर्सशी बोलू लागला. त्यानंतर गंभीरने येऊन मेयर्सला विराटपासून दूर नेले आणि त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. यानंतर गंभीर काहीतरी बोलतो, ज्यावर कोहली त्याला जवळ बोलावतो आणि दोघांमध्ये वादावादी झाली. या वादावादीच्‍या घटनेची साेशल मीडियावर तुफान चर्चा झाली. पुढील सामन्‍यात जेव्‍हा नवीन आणि  गंभीर मैदानावर एकत्र दिसले तेव्‍हा विराट काेहलीच्‍या चाहत्‍यांनी विराटच्‍या नावाचा जयघाेष करुन मैदान दणाणून साेडले हाेते.

गावस्कर यांनी घेतला धोनीचा ऑटोग्राफ

IPL 2023 मध्ये चेपॉक मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात 14 मे रोजी एक मनोरंजक सामना खेळला गेला. कोलकाताने हा सामना सहा गडी राखून जिंकला. सामन्यानंतर जे घडले ते पाहून चाहते भावूक झाले. सामना संपल्यानंतर चेन्नईचे खेळाडू चाहत्यांचे आभार मानण्यासाठी चेन्नई स्टेडियममध्ये फिरत होते. दरम्यान, भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावसकर, जो आयपीएलमधील समालोचन संघाचा भाग आहे. ते धोनीकडे धावत आले त्‍यांनी शर्टवर ऑटोग्राफची मागणी केली. यानंतर धोनी हसायला लागला आणि त्याने गावस्कर यांच्या शर्टवर ऑटोग्राफ दिला. हा क्षण पाहून चेपॉक स्टेडियमवर उपस्थित असलेले चाहते आणि सोशल मीडिया यूजर्स भावूक झाले.

जडेजाच्या थ्रोवर वॉर्नरच्या बॅटची ‘तलवारबाजी’

20 मे रोजी फिरोजशाह कोटला स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात मैदानावर अनेक रोमांचक क्षण घडले. रवींद्र जडेजाला चिडवण्यासाठी डेव्हिड वॉर्नरने बॅटने ‘तलवारबाजी’ सुरू केल्यावर सर्वात मनोरंजक घटना घडली. हे दृश्य पाहून स्टेडियममध्ये उपस्थित असलेले चाहते खूश झाले आणि त्यांनी टाळ्या वाजवल्या. वास्तविक, सामन्यादरम्यान दिल्लीच्या डावातील पाचव्या षटकात दीपक चहर गोलंदाजी करत होता. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर वॉर्नरने शॉट मारला. यानंतर त्यांनी सिंगल धाव घेतली. मोईन अलीने केलेला थ्रो रहाणेपर्यंत पोहोचला. वॉर्नरने दुसरा फलंदाज फिलिप सॉल्टकडून आणखी एक धाव मागितली आणि तो पुढे गेला, पण नंतर रहाणेच्या हातात चेंडू पाहून क्रीझपासून थोडे पुढे जाऊन थांबला. रहाणेने केलेला थ्रो जडेजाने रोखला. वॉर्नरने पुन्हा नॉन स्ट्रायकरच्या शेवटी क्रीजमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. जडेजानेही चेंडू पकडून फेकण्याची शैली केली. यावर वॉर्नरने मजेशीर उत्तर दिले. जडेजाला चिडवण्यासाठी त्याने जडेजा स्टाईलमध्ये बॅटने ‘तलवारबाजी’ केली. शतक किंवा अर्धशतक झळकावल्यानंतर जडेजा अशा प्रकारे बॅटने सेलिब्रेशन करतो. हे पाहून जडेजा हसायला लागला. यावेळी वॉर्नर आणि सॉल्टसह सर्व खेळाडूही हसायला लागले.

अर्शदीपने सलग दोन चेंडूंमध्ये दोन स्टंप तोडले

22 एप्रिल रोजी पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला. या सामन्यात पंजाबचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने घातक गोलंदाजी करताना चार बळी घेतले. यामध्ये शेवटच्या 20 व्या षटकात टिळक वर्मा आणि नेहल वढेरा यांच्या विकेट्सचा समावेश आहे. अर्शदीपने टिळक आणि नेहलला गोलंदाजी करताना दोन्ही वेळेस मधल्या स्टंप मोडल्या. अशा स्थितीत पंचांना दोन्ही वेळा नवीन स्टंप बसवावे लागले. पंजाबने हा सामना 13 धावांनी जिंकला.

IPL इतिहासात प्रथमच दोन अनकॅप्ड खेळाडूंनी शतक झळकावले

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एका हंगामात दोन अनकॅप्ड खेळाडूंनी शतक केले. यामध्ये राजस्थान रॉयल्सचा यशस्वी जैस्वाल आणि पंजाब किंग्जचा प्रभसिमरन सिंग यांचा समावेश आहे. यशस्वीने मुंबई इंडियन्स विरुद्ध आयपीएल 2023 च्या 42 व्या सामन्यात 62 चेंडूत 124 धावांची खेळी खेळली. या खेळीत त्याने 16 चौकार आणि आठ षटकार मारले. मात्र, राजस्थानचा संघ हा सामना हरला. यशस्वीची बॅट इथेच थांबली नाही. त्याने 11 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध IPL इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम केला. त्याने 13 चेंडूत अर्धशतक केले आणि केएल राहुलचा 14 चेंडूत अर्धशतक करण्याचा विक्रम मोडला. त्याच वेळी, आयपीएल 2023 च्या 59 व्या सामन्यात पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा 31 धावांनी पराभव केला. या सामन्यात पंजाबचा हिरो होता प्रभसिमरन सिंग, ज्याने १०३ धावांची शानदार शतकी खेळी केली. IPL इतिहासात शतक झळकावणारा प्रभसिमरन सिंग हा सातवा अनकॅप्ड खेळाडू ठरला. यापूर्वी हा पराक्रम शॉन मार्श, मनीष पांडे, पॉल वल्थाटी, रजत पाटीदार, यशस्वी जैस्वाल यांनी केला आहे. यशस्वीने या हंगामात 14 सामन्यांमध्‍ये 625 धावा केल्या.

मोहित शर्माचे आयपीएलमध्ये जबरदस्त पुनरागमन

IPL ही जगातील सर्वात मोठी T20 क्रिकेट लीग आहे. खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्यासाठीचे हे एक मोठे व्यासपीठ आहे. मोहित शर्मानेही याच व्‍यासपीठावर यंदा जबरदस्‍त पुनरागमन केले. मोहितने 30 महिन्यांनंतर आयपीएलमध्ये परतला. त्‍याने दमदार गाेलंदाजीचे प्रदर्शन केले. 2020 च्या हंगामात मोहितला दिल्ली कॅपिटल्सने करारबद्ध केले होते; परंतु तो आपला प्रभाव पाडू शकला नाही. या आयपीएलनंतर मोहितला पाठीला दुखापत झाली. तो काही काळ क्रिकेटपासून दूर होता. पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन केल्यानंतर मोहितने देशांतर्गत क्रिकेट खेळले. 2022 च्या मेगा लिलावात कोणत्याही फ्रँचायझीने त्याच्यामध्ये स्वारस्य दाखवले नाही आणि मोहित विकला गेला नाही. मात्र, लिलावात निवड न होऊनही तो लीगचा भाग राहिला. त्याला गुजरात टायटन्सने नेट बॉलर म्हणून संघात घेतले. मोहितने गुजरातच्या फलंदाजांना नेटमध्ये तयार केले आणि हार मानली नाही. या मोसमात मोहित पुन्हा लिलावात उतरला आणि गुजरातने त्याला त्याच्या मूळ किमतीत विकत घेतले. गुजरातचा हा निर्णय योग्य ठरला आणि त्याने या मोसमात 24 विकेट घेतल्या. डेथ ओव्हर्समध्ये मोहित शर्माच्या गोलंदाजीमुळे गुजरात संघाने अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवला. मुंबईविरुद्धच्या क्वालिफायर-2 मध्ये मोहितने 10 धावांत पाच विकेट्स घेतल्या.

सूर्यकुमारने IPL कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले

मुंबई इंडियन्सचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने आयपीएलमधील पहिले शतक झळकावले. सूर्यकुमारने १२ मे रोजी वानखेडे स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध नाबाद १०३ धावांची खेळी केली. त्याने 49 धावांच्या खेळीत 11 चौकार आणि सहा षटकार मारले. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 210.20 होता. सूर्यकुमारच्या या खेळीमुळे मुंबईने साखळी फेरीत गुजरातचा पराभव केला. याच सामन्यात राशिद खानने 32 चेंडूत तीन चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने नाबाद 79 धावांची स्फोटक खेळी खेळली.

चेन्नईत धोनीने घेतला लेप ऑफ ऑनर

IPL 2023 मध्ये, चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना 14 मे रोजी चेपॉक स्टेडियमवर खेळला गेला. चेपॉक येथील साखळी फेरीतील चेन्नईचा हा शेवटचा सामना होता. केकेआरने हा सामना जिंकला. सामना संपल्यानंतर धोनीने चेन्नईतील चेपॉक येथे मानाचा तुरा रोवला. त्याने सहकारी खेळाडूंसोबत स्टेडियमचा फेरफटका मारला आणि संघाला नेहमीच पाठिंबा दिल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले. धोनीसोबत टीमचे सीईओ काशी विश्वनाथन, रवींद्र जडेजा, मोईन अली, अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे, दीपक चहर, प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांच्यासह संपूर्ण टीम होती. धोनीने सन्मानाच्या वेळी गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे गुडघ्याला पट्टी देखील घातली होती. मोसमाच्या सुरुवातीपासून धोनीला दुखापत झाली होती. सामन्यादरम्यान तो जखमी असल्‍याचे दिसले. यादरम्यान त्याने CSK लोगो असलेला चेंडू प्रेक्षकांना भेट दिला. यापूर्वी त्याने प्रेक्षकांना काही जर्सीही भेट दिल्या होत्या. यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या पोलिस आणि इतर कर्मचाऱ्यांनीही धोनीचा ऑटोग्राफ घेतला आणि त्याच्यासोबत फोटो काढले.

रिंकू सिंगचे सलग पाच षटकार आणि केकेआरचा विजय

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ९ एप्रिल रोजी गुजरातचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातने २० षटकांत ४ गडी गमावून २०४ धावा केल्या होत्या. कोलकात्याची सुरुवात चांगली झाली पण राशिद खानने १७व्या षटकात हॅट्ट्रिक घेत सामना गुजरातकडे वळवला. कोलकाताला शेवटच्या षटकात विजयासाठी २९ धावा करायच्या होत्या. ती मॅच हरेल असं वाटत होतं, पण युवा डावखुरा स्टार रिंकू सिंगने चमत्कार केला. रिंकूने यश दयालच्या शेवटच्या षटकात सलग पाच षटकार ठोकत कोलकाताला संस्मरणीय विजय मिळवून दिला.

संदीप शर्माच्या नो बॉलने राजस्थानला केले बाद

७ मे रोजी राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रोमांचक सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 2 गडी गमावून 214 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादला शेवटच्या षटकात १७ धावांची गरज होती. त्यानंतर अब्दुल समद आणि मार्को जॅन्सेन क्रीजवर होते. संदीप शर्मा गोलंदाजीला आला आणि त्याने पहिल्या पाच चेंडूत १२ धावा दिल्या. शेवटच्या चेंडूवर पाच धावा हव्या होत्या. त्यानंतर संदीपने ओव्हर स्टेप करून नो बॉल टाकला. अशा स्थितीत अब्दुल समदने शेवटच्या चेंडूवर फ्री-हिटवर षटकार ठोकत हैदराबादला चार गडी राखून विजय मिळवून दिला. या एका सामन्यातील पराभवामुळे राजस्थानचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नाही.

शाहरुखने कोहलीला ‘झूमे जो पठाण’ गाण्यावर शिकवला डान्स

इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामात 6 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना खेळला गेला. यामध्ये कोलकाता संघाने आक्रमक कामगिरी करत विजय मिळवला. ईडन गार्डन्सवर खेळला जाणारा हा सामना पाहण्यासाठी कोलकाताचा मालक शाहरुख खानही पोहोचला. सामन्यानंतर त्याने विराट कोहलीसोबत डान्सही केला, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या सामन्यात आपल्या संघाच्या शानदार विजयानंतर शाहरुख खान खूप आनंदी दिसत होता. शाहरुखने मैदानात येऊन सर्व खेळाडूंना अलिंगन दिले. यानंतर त्याने विराट कोहलीला पठाण चित्रपटातील ‘झूमे जो पठाण’ या गाण्याच्या डान्स स्टेप्सही शिकवल्या.

कोहलीने झळकावली सलग दोन शतके

आरसीबीला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी साखळी फेरीतील शेवटचे दोन सामने जिंकावे लागले. आयपीएल 2023 च्या 65 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आरसीबीला 187 धावांचे लक्ष्य मिळाले. बंगळुरूने हा सामना आठ गडी राखून जिंकला. कोहलीने या सामन्यात 63 चेंडूत 12 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 100 धावा केल्या. त्याचे आयपीएल कारकिर्दीतील हे पाचवे शतक होते. यानंतर आरसीबीचा साखळी फेरीतील शेवटचा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध होता. या सामन्यातील विजयासह बेंगलोर प्लेऑफमध्ये पोहोचला असता. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना कोहलीने 61 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या. त्याने 13 चौकार आणि 1 षटकार लगावला. या खेळीमुळे आरसीबीने 20 षटकांत 5 गडी गमावून 197 धावा केल्या. मात्र, गुजरातने 19.1 षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले आणि आरसीबी बाद झाला.

किंग कोहलीनंतर शुभमन गिल चमकला

IPL 2023 च्या शेवटच्या साखळी फेरीच्या सामन्यात टेबल टॉपर्स गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहा गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने 20 षटकांत 5 गडी गमावून 197 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने 19.1 षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले. बंगळुरूसाठी विराट कोहलीने 61 चेंडूत नाबाद 101 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. त्याचवेळी गुजरातसाठी कोहलीचा उत्तराधिकारी मानला जाणाऱ्या शुभमन गिलने 52 चेंडूत नाबाद 104 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार आणि आठ षटकार मारले. शुभमनचे हे शतक त्याचे आयपीएलमधील सलग दुसरे शतक होते.

धोनी आणि चाहत्यांचा जल्लोष

आयपीएल कारकिर्दीतील पाचवी ट्रॉफी जिंकल्यानंतर धोनी निवृत्त होऊ शकतो. धोनीच्या चाहत्यांना सीझनच्या सुरुवातीपासूनच हे समजले होते आणि या सीझनमध्ये धोनी जिथे जिथे खेळला तिथे त्याचे चाहते त्याला निरोप देण्यासाठी आले. धोनी कोलकाता ते जयपूरपर्यंत जिथे जिथे खेळला तिथे त्याचे चाहते त्याला निरोप द्यायला आले. या कारणामुळे धोनी कोलकात्यात भावूक झाला आणि त्याने कारकिर्दीतील जुने दिवस आठवले. करिअरच्या सुरुवातीला धोनी खडगपूर रेल्वे स्टेशनवर काम करायचा आणि कोलकात्याच्या मैदानातच खेळायला यायचा. अनेक विरोधी संघांच्या कर्णधारांनीही हे सत्य मान्य केले. जयपूरच्या संपूर्ण स्टेडियममध्ये चेन्नईचे चाहते पाहून संजू सॅमसन म्हणाला की, सहसा हे चाहते राजस्थानला सपोर्ट करतात, पण धोनीमुळे सगळे चेन्नईच्या जर्सीत स्टेडियममध्ये पोहोचले.

पावसाने व्यत्यय आणलेला सामना चेन्नई सुपर किंग्जने डकवर्थ लुईस पद्धतीच्या आधारे पाच गडी राखून जिंकला. चेन्नईला शेवटच्या दोन चेंडूत 10 धावांची गरज होती. त्यानंतर जडेजाने पाचव्या चेंडूवर षटकार आणि शेवटच्या चेंडूवर चौकार मारून चेन्नईला विजय मिळवून दिला. यानंतर जडेजा डगआऊटच्या दिशेने धावत गेला. धोनीने तिथे जावून आनंदाने जडेजाला उचलले. धोनी याआधी असे सेलिब्रेशन करताना कधीही दिसला नव्हता. सामना संपल्यानंतर धोनी खूपच भावूक दिसत होता.

हेही वाचा : 

Back to top button