पुढारी ऑनलाईन डेस्क : चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023 चे विजेतेपद पटकावले आहे. चेन्नईने गुजरातचा पाच गडी राखून पराभव केला. अंतिम सामना संपल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने आपल्या निवृत्तीबाबत भाष्य केले. जाणून घेवूया धोनी काय म्हणाला या विषयी
सामना संपल्यानंतर बोलताना धोनी म्हणाला की, तुम्ही माझ्या निवृत्तीबद्दल उत्तरे शोधत आहात? परिस्थिती पाहता, माझी निवृत्ती जाहीर करण्याची हीच सर्वोत्तम वेळ आहे; पण या वर्षी चाहत्यांनी माझ्यावर दाखवलेल्या प्रेमाबद्दल आणि आपुलकीबद्दल धन्यवाद म्हणणे सोपे जाईल. तथापि, माझ्यासाठी सर्वात कठीण गोष्ट म्हणजे पुढील नऊ महिने कठोर परिश्रम करणे आणि नंतर परत येऊन आयपीएलचा आणखी एक हंगाम खेळणे, असेल असेही त्याने स्पष्ट केले. ( MS Dhoni IPL 2023 )
धोनी म्हणाला – शरीरावर बरेच काही अवलंबून असते. माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी सहा ते सात महिने आहेत. माझ्यासाठी हे सोपे नाही, पण चाहत्यांसाठी ही भेट आहे. चाहत्यांनी ज्या प्रकारे आपले प्रेम आणि आपुलकी दाखवली आहे, त्यावरून मला वाटते की मी त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे.
यंदाच्या आयपीएलमध्ये मी पहिल्या सामन्यात मैदानावर आलो तेव्हा चाहते माझ्या नावाचा जयघोष करत होते. यावेळी माझे डोळे पाण्याने भरले. मी काही वेळ तिथेच उभा राहिलो. मला याचा आनंद घ्यायचा आहे हे लक्षात आले. चेन्नईतही माझी हीच भावना होती, तिथे माझा शेवटचा सामना होता; पण मला परत येऊन त्यांच्या (चाहत्यांसाठी) जे काही करता येईल ते करायचे आहे आणि खेळायचे आहे. मी कोण आहे म्हणून ते माझ्यावर प्रेम करतात. मी ज्या प्रकारचे क्रिकेट खेळतो, मला वाटते की स्टेडियममधील प्रत्येकजण असेच खेळू शकतो, असे मला वाटते. त्यामुळे इतर कोणापेक्षाही ते माझ्याशी जास्त रिलेट करू शकतात असे मला वाटते. मी स्वतःला बदलू इच्छित नाही, मी स्वत:ला मी नसलेल्या व्यक्तीच्या रूपात सादर करू इच्छित नाही, असेही त्याने सांगितले.
प्रत्येक ट्रॉफी खास असते, पण आयपीएलची खास गोष्ट म्हणजे तुम्ही आव्हानात्मक सामन्यांसाठी तयार असणे आवश्यक आहे. हे आम्ही केले आहे. अंतिम सामन्यात आमच्याकडून काही त्रुटी राहिल्या, गोलंदाजी विभागाने योग्य काम केले नाही, पण फलंदाजी विभागाने त्यांच्यावर दबाव टाकला. मलाही राग येतो. हे मानवी आहे; परंतु मी स्वतःला त्यांच्या स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येकजण दबाव वेगळ्या पद्धतीने हाताळतो, असेही धोनीने सांगितले.
फायनल सामन्यापूर्वी निवृत्ती जाहीर करणा्या अंबाती रायडूचेही यावेळी धोनीने कौतुक केले. तो म्हणाला, रायुडू जेव्हा मैदानात असतो तेव्हा तो नेहमी त्याचे शंभर टक्के देतो. त्याचे संघासाठी नेहमी कोणत्या ना कोणत्या प्रकारे योगदान असायचे. संपूर्ण कारकिर्दीत तो एक उत्कृष्ट क्रिकेटपटू राहिला आहे. भारत अ दौऱ्यापासून मी बराच काळ त्याच्यासोबत खेळत आहे. फिरकी आणि वेगवान गोलंदाज दोन्ही बरोबरीने तो खेळू शकतो. मी त्यांच्यासाठी खूप आनंदी आहे. यंदाच्या आयपीएलमधील अंतिम सामना नेहमी त्याच्या लक्षात राहील असा आहे. तो देखील माझ्यासारखाच कमी फोन वापरणार आहे. त्याची कारकीर्द खूप चांगली आहे आणि मला आशा आहे की तो त्याच्या आयुष्याचा पुढचा टप्पा एन्जॉय करेल.
सर्वाधिक आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या कर्णधारांच्या बाबतीत धोनीने रोहितची बरोबरी केली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाच ट्रॉफी जिंकल्या आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाचा दहावा अंतिम सामना होता.
हेही वाचा :