गोमांस कंपनीकडून मोदींना ५५० कोटी : संजय राऊत यांचा आरोप

गोमांस कंपनीकडून मोदींना ५५० कोटी : संजय राऊत यांचा आरोप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेवटची फडफड सुरू आहे. त्यांचे राजकारण लवकरच संपेल असा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांना गांभीर्याने घेऊ नका. ते राजकारणातले एकदम कच्चे मडके आहे असा टोलाही राऊत यांनी लगावला.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ नाशिक दौऱ्यावर आलेल्या राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्रात महाविकास आघाडी किमान ३५ जागा जिंकेल, असा दावा करत, नाशिकमध्ये डॅमेज कंट्रोलसाठी आलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर राऊत यांनी निशाणा साधला. मुख्यमंत्री या निवडणुकीत पुरवठा करायला येत असतील, असा टोमणा मारताना शिंदे, अजितदादा आणि फडणवीस यांनी टेम्पो भरून पैसे आणून दिले, तरी काही होणार नाही. जनता त्यांना अजिबात मतदान करणार नाही. मोदी महाराष्ट्रात ठाण मांडून बसले आहेत, तरीही काही परिणाम होणार नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडी किमान 35 जागा जिंकेल. अजितदादांच्या उमेदवारांच्या निवडणुका संपल्याने ते आता मोकळे झाले आहेत. शिंदे धावपळ करताहेत मात्र त्यांची आता ही शेवटची फडफड आहे, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला. नंदुरबार येथे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या सभेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. महाविकास आघाडी पुन्हा काही सभा घेणार का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, नंदुरबार हा काँग्रेसचा गड राहिलेला आहे. यंदा नंदुरबारमध्ये महाविकास आघाडी जिंकणार आहे. इंदिरा गांधी त्यांच्या प्रचाराची सुरुवात वर्षानुवर्षे नंदुरबारमधून करत आलेल्या आहेत. यंदा प्रियांका गांधी आल्या. त्यामुळे नंदुरबारमध्ये परिवर्तन होणार आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या टीकेलाही राऊत यांनी उत्तर दिले. बावनकुळे यांचा महाराष्ट्रातील संस्कृतीशी संबंध राहिलेला नाही, अशी टीका त्यांनी केली.

गोमांस कंपनीकडून मोदींना ५५० कोटी
गोमांस कंपनीकडून मोदींनी पैसे घेतले, असा आरोप संजय राऊत यांनी केला. यावर ते म्हणाले की, हा आरोप मी आज करत नाही आहे. बँकेतील निवडणूक रोख्यातील जी माहिती आली आहे, त्यातून बिफ एक्स्पोर्टच्या माध्यमातून भाजपला 550 कोटी मिळाल्याचे समोर आल्याचा दावा राऊत यांनी केला.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news