सचिन सावंत : भाजपला थेट अंगावर घेणाऱ्या सचिन सावंतांनी राजीनाम्याचे हत्यार का उपसले? | पुढारी

सचिन सावंत : भाजपला थेट अंगावर घेणाऱ्या सचिन सावंतांनी राजीनाम्याचे हत्यार का उपसले?

मुंबई : पुढारी ऑनलाईन

प्रदेश काँग्रेसमध्ये नव्या नियुक्त्या झाल्यानंतर आता नाराजीचे सूर उमटत असून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राजीनामा दिला आहे. अतुल लोंढे यांना मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्त केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला.

सावंत यांचे नाव विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत आहे. ही यादी अद्याप राज्यपालांनी मंजूर केलेली नाही.
सावंत हे गेल्या १० वर्षांपासून काँग्रेसची बाजू भक्कमपणे माध्यमांसमोर मांडत होते. तसेच ते भाजपचे कडवे विरोधक म्हणून ओळखले जात होते. मात्र, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे समर्थक लोंढे यांना बढती दिल्याने ते नाराज झाले आहेत.

सावंत यांनी त्यांचा राजीनामा काँग्रेस हायकमांडला पाठवला असून आपल्याला या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती केली आहे.
काल जाहीर झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये नाना पटोले यांच्या समर्थकांचीच सर्वाधिक वर्णी लागली आहे. अतुल लोंढे हे पटोले समर्थक आहेत. त्यामुळेच त्यांना मुख्य प्रवक्तेपद मिळाले, असा आरोप केला जात आहे.

माध्यम आणि संवाद विभागाची तसेच मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अतुल लोंढे यांच्याकडे सोपवण्यात आली असून सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत आणि जाकीर अहमद यांचाही या समितीत समावेश आहे. अध्यक्ष व मान्यवरांच्या दौऱ्याच्या नियोजनाची जबाबदारी प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. सोशल मीडिया विभागप्रमुख म्हणून प्रदेश सरचिटणीस विशाल मुत्तेमवार यांची नियुक्ती दिली आहे.

सचिन सावंत राजीनामा : आमदारांच्या यादीत सावंत यांचे नाव

विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या यादीत सचिन सावंत यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र ही यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सही न करता आपल्याकडे ठेवली आहे. या यादीवरून राज्याच्या राजकारणात बरेच दिवस वाद सुरु आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी कोश्यारी यांना अनेकदा चिमटे काढत सुनावले आहे. परंतु कोश्यारी यांनी अद्याप निर्णय घेतला नाही.

हेही वाचलं का? 

Back to top button