uttarakhand rain : काश्मीर ते कन्याकुमारी आभाळं फाटलं ! आता उत्तराखंडमध्ये जलप्रलय | पुढारी

uttarakhand rain : काश्मीर ते कन्याकुमारी आभाळं फाटलं ! आता उत्तराखंडमध्ये जलप्रलय

देहराडून/नैनीताल; पुढारी ऑनलाईन

दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे उत्तराखंडमध्ये (uttarakhand rain) कहर झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये 47 लोकांचा मृत्यू झाला आहे. या आपत्तीचा परिणाम कुमाऊं प्रदेशावर झाला आहे. पाऊस आणि भूस्खलनामुळे उत्तराखंडच्या नैनीताल, हल्दवानी, उधम सिंह नगर आणि चंपावत जिल्ह्यात हाहाकार उडाला आहे. नैनीतालमध्ये 28 आणि अल्मोडा आणि चंपावत जिल्ह्यात 6-6 लोकांचा मृत्यू झाला. पिथोरागड आणि उधम सिंह नगर जिल्ह्यात 1-1 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

उत्तराखंडमध्ये (uttarakhand rain) मुसळधार पावसामुळे झालेल्या विध्वंसात आतापर्यंत एकूण 47 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे राज्यातील कुमाऊं भागात कहर झाला आहे.पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी चर्चा केली. बचाव कार्यात हवाई दलालाही पाचारण करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे नैनीतालचा उत्तराखंडच्या इतर भागांशी संपर्क तुटला होता, पण तो आता पूर्ववत झाला आहे.

नैनीतालमधील बंद रस्ते उघडण्यात आले

खराब हवामान आणि संततधार पाऊस असूनही, नैनीतालमधील बंद रस्ते उघडण्यात आले आहेत, रस्त्यावर वाहून आलेला राडरोडा काढून टाकण्यात आला आहे आणि पर्यटन स्थळाशी संपर्क पूर्ववत करण्यात आला आहे. अडकलेले पर्यटक काळाधुंगी आणि हल्दवानी मार्गे आपल्या घराकडे रवाना होत आहेत.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पावसामुळे (uttarakhand rain) प्रभावित क्षेत्रांचे हवाई सर्वेक्षण केले. त्यांनी बाधित लोकांशी संवाद साधला आणि जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीचा अंदाज घेतला. भाजप सरकारने पावसामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. ज्यांचे घर पाडण्यात आले आहे, त्यांना 1.10 लाख रुपये मिळतील. ज्यांची जनावरे मारली गेली आहेत, त्यांनाही नुकसानभरपाई दिली जाईल.

पीएम मोदींची चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपत्तीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर सीएम धामी यांच्याशी फोनवर चर्चा केली. केंद्र सरकारने सर्व शक्य मदतीचे आश्वासन दिले आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम आधीच प्रभावित भागात मदत आणि बचाव कार्यात गुंतलेली आहेत.

उत्तराखंडचे पोलीस महासंचालक अशोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नैनीतालच्या काठगोदाम, लालकुआन आणि उधम सिंह नगरच्या रुद्रपूरमध्ये रस्ते, पूल आणि रेल्वे ट्रॅकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खराब झालेले रेल्वे रुळ दुरुस्त करण्यासाठी किमान 4-5 दिवस लागतील आणि तोपर्यंत येथे गाड्या चालवता येणार नाहीत.

आपत्तीग्रस्त भागात बचाव कार्यात हवाई दलालाही जमवण्यात आले आहे. हवाई दलाची 3 हेलिकॉप्टर मदत आणि बचाव कार्यात मदत करत आहेत. नैनीतालमध्ये दोन हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. तिसरे हेलिकॉप्टर गढवाल प्रदेशात बचाव कार्यात गुंतले आहे.

चारधाम यात्रा आज पुन्हा सुरू होणार आहे. डीजीपी म्हणाले की, बद्रीनाथचे शेवटचे टोक असलेल्या चारधाम यात्रेचा मार्ग पूर्णपणे पूर्ववत करण्यात आला आहे. जोशीमठ ते बद्रीनाथ हा रस्ता खुला करण्यात आला आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button