नाशिक : प्राध्यापकांच्या प्रश्नांवर आज तोडगा निघणार? | पुढारी

नाशिक : प्राध्यापकांच्या प्रश्नांवर आज तोडगा निघणार?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागात कार्यरत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहे. या प्रकरणी आमदार सत्यजित तांबे यांनी नुकतीच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन व्यथा मांडल्या. पाटील व तांबे यांच्या सूचनेनुसार मंगळवारी (दि. 16) अधिकार्‍यांसोबत बैठक होणार असून, त्यात शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या प्रश्नांवर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

राज्याच्या तंत्रशिक्षण खात्यांतर्गत येणार्‍या सर्व शासकीय अनुदानित खासगी संस्थांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना 100 टक्के वेतन देण्यात यावे तसेच सर्व सहसंचालक कार्यालयांमध्ये ऑनलाइन नोंदणी व ट्रॅकिंग सिस्टिम लागू करण्याची मागणी आहे. यासोबतच अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक संवर्गाच्या शारीरिक शिक्षण संचालक व ग्रंथपालपदांची भरतीप्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी, यासह तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे तांबे यांनी लक्ष वेधले. दरम्यान, राज्यात शिक्षण क्षेत्राशी निगडित अनेक प्रश्न प्रलंबित असून, विविध संघटनांची निवेदने प्राप्त झालेली आहेत. त्यानुसार या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी संबंधित अधिकारी व संघटनांचे पदाधिकारी यांची एक संयुक्त बैठक आयोजित करण्याची विनंती ना. पाटील यांना केली होती. या सर्व प्रश्नांची यादी त्यांना दिली असून, मंगळवारी (दि.16) अधिकार्‍यांसह बैठक होणार असल्याचे तांबे यांनी सांगितले. तंत्रशिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत होणारी बैठक यशस्वी झाली, तर शिक्षकांचे अनेक प्रश्न निकाली निघण्याची शक्यता असल्याने राज्यभरातील शिक्षकांचे लक्ष त्याकडे लागले आहे.

हेही वाचा:

Back to top button