कुकाणा : कांद्याने केला शेतकर्‍यांचा वांदा; सडल्याने रोटाव्हेटर फिरवून गाडला मातीत | पुढारी

कुकाणा : कांद्याने केला शेतकर्‍यांचा वांदा; सडल्याने रोटाव्हेटर फिरवून गाडला मातीत

कुकाणा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्याच्या पूर्व भागातील कुकाण्यासह पंचक्रोशीत अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. शेतकर्‍यांनी लाखो रूपयांचा कांदा शेतात टाकून नांगर व रोटाव्हेटर फिरवून शेतात गाडला. त्यामुळे शेतकर्‍यांचा खर्च वाया गेला आहे. मागील महिन्यात सलग आठ दिवसांच्या अंतराने वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने तालुक्याच्या पूर्व भागातील देवगाव, जेऊर हैबती, कुकाणा अंतरवली, देवसडे, तेलकुडगाव, देडगाव परिसरात कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले.

काढणीस आलेला कांदा भिजल्याने शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च वाया गेला. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. भाव नाही, नेमकं या कांद्याचे करायचं काय, असा प्रश्न शेतकर्‍यांना भेडसावत आहे. काही शेतकर्‍यांनी गोळा करून ठेवलेला कांदा ट्रॅक्टरने, तसेच जेसीबीने शेतात पसरवून रोटाव्हेटरने नांगरट केलेल्या शेतात गाडला आहे.

देवगाव येथील अमोल रोडगे यांनी जेसीबीने कांदा शेतात पसरवून त्यावरत रोटाव्हेटर फिरविला. त्याचप्रमाणे तेलकुडगाव परिसरातही अनेक शेतकर्‍यांनी कांदा शेतामध्ये पसरवून त्यावर रोटाव्हेटर फिरवून कांदा मातीत गाडला. शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याने राज्य सरकारने आर्थिक मदत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Back to top button