राहुरीत गुन्हेगारीच्या आलेखामध्ये मोठी वाढ | पुढारी

राहुरीत गुन्हेगारीच्या आलेखामध्ये मोठी वाढ

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून राहुरी शहर तसेच तालुक्यात गुन्हेगारींच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पोलिसांना गुन्ह्यांची उकल होत नसल्याने गुन्हेगारीचा आलेख उंचावत चाललेला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये घडलेल्या घटानांमध्ये लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेलेला आहे. पहिल्या घटनेत नगर ते राहुरी दरम्यान एसटी बसमध्ये प्रवास करत असलेल्या महिलेच्या बॅगमधील 40 हजार रुपये किमतीची सोन्याची पोत व पाच हजार रुपये रोख रक्कम अज्ञात भामट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली दीपमाला लाजरस कदम (वय 40) या नाशिक येथील आंबड लिंक रोड, संजयनगर, येथे राहत आहेत.

दिनांक 10 मे रोजी सकाळी त्या त्यांच्या कुटुंबासह अहमदनगर येथे नातेवाईकांच्या लग्नाला गेल्या होत्या. लग्नाचा कार्यक्रम आवरून त्या कुटुंबासह सायंकाळी 6.30 वाजे दरम्यान अहमदनगर येथील माळीवाडा बस स्थानकावरून अहमदनगर ते येवला जाणारे बसमध्ये राहुरीला जाण्यासाठी बसल्या होत्या. दरम्यान देहरे टोलनाक्या जवळ बस गरम होऊन खराब झाल्याने बस तेथे रस्त्याच्या कडेला थांबली होती. त्यानंतर बस परत चालू झाल्यानंतर बस राहुरीकडे जाण्यासाठी निघाली.

अंधार झाल्याने दीपमाला कदम यांनी त्यांच्या गळ्यातील 40 हजार रुपये किमतीची सोन्याची पोत व पाच हजार रुपये रोख रक्कम त्यांच्या बॅगमध्ये ठेवले. रात्री 8.15 वाजेच्या सुमारास बस राहुरी बस स्थानक येथे थांबल्यावर त्या कुटुंबासह बसमधून उतरल्या. त्यावेळी त्यांनी बॅग तपासली असता त्यांच्या बॅगमधील सोन्याची पोत व पाच हजार रुपए रोख रक्कम असा एकूण 45 हजार रुपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात भामट्याने चोरून नेल्याचे दिसून आले. घटनेनंतर त्यांनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.

दुसर्‍या घटनेत राहुरी कडून सोनईकडे जाणार्‍या रोडवर उंबरे गावच्या शिवारात एका मोटरसायकल स्वारास तीघा जणांनी अडवून बेदम मारहाण केली. तसेच चाकूचा धाक दाखवून मोबाईल व एक तोळ्याची सोन्याची अंगठी काढून नेल्याची घटना घडली.
विकास विठ्ठल कुसळकर (वय 24, रा. बालाजी मंदीर जवळ, सोनई ता. नेवासा) या तरूणाचे हनुमान जयंतीच्या मिरवणुकीच्या वेळेस त्याच्याच गावातील अजय राजेंद्र शिंदे याच्या बरोबर वाद झाला होता. सदर वाद त्यांनी आपसांत मिटवला होता.

यानंतर विकास कुसळकर हा त्याच्या मोटरसायकलवर राहता तालुक्यातील लोणी येथे एका नातेवाईकाच्या लग्न समारंभात गेला होता. लग्न समारंभ आटोपल्यानंतर तो मोटरसायकलवर राहुरीकडून सोनईकडे जात होता. पाठीमागून मोटरसायकलवर आलेल्या तीन आरोपींनी विकास कुसळकर याची मोटरसायकल अडवून विकास कुसळकर याला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. नंतर चाकूचा धाक दाखवून त्याचा मोबाईल व तसेच हाताचे बोटात असलेली एक तोळ्याची सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेतली.  तिसर्‍या घटनेत राहुरी तालूक्यातील म्हैसगाव येथील भास्कर राजाराम बेलकर हा गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदा खाजगी सावकारकी करतो. त्यावर गुन्हा दाखल झालेला आहे.

गुन्हेगारांवर वचक निर्माण करावा

राहुरी शहरामध्ये गुन्हेगारीचा आलेख उंचावत असताना तपास मात्र अत्यंत धिम्यागतीने सुरू आहे. मागील गुन्ह्यांची उकल होत नसतानाच पुन्हा नव्याने गुन्हे घडत आहे. माजी पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यास सुरूवात केली होती. परंतु काही कारणास्त त्यांची बदली झाली. त्यानंतर गुन्हेगारांनी आपले हातपाय पसरविण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांनी गुन्हेगारांचा वचक निर्णान करण्याची मागणी होत आहे.

Back to top button