नाशिक : बेकायदा सरकारचे विधान संजय राऊतांना पडले महाग! | पुढारी

नाशिक : बेकायदा सरकारचे विधान संजय राऊतांना पडले महाग!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
‘हे सरकार तीन महिन्यांत जाणार, मरण अटळ आहे. बेकायदा सरकारचे बेकायदा आदेश पाळू नका तुम्ही अडचणीत याल’, असे वक्तव्य केल्याप्रकरणी खा. संजय राऊत यांच्याविरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, खा. राऊत हे शुक्रवारी (दि.12) नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी वक्तव्य करून सार्वजनिक आगळीक होण्यासारखे व पोलिसांची प्रतिमा मलीन होईल, असे विधान केले.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे शुक्रवारी नाशिक दौर्‍यावर असताना सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षावरील निकालाबाबत पत्रकार परिषदेत बोलत होते. शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी विविध विषयांवर मत मांडताना सरकार बेकायदा असल्याचे सांगत त्यांचे आदेश पाळू नका, तुम्ही अडचणीत याल असे सांगितले होते. या विधानामुळे पोलिसांविषयी अप्रितीची भावना निर्माण होत सार्वजनिक शांतता बिघडण्यास प्रवृत्त होईल, असे विधान केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या पत्रकार परिषदेत सत्ताधारी शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या सत्तेवर टीका करताना त्यांनी पोलिसांनाही आव्हान दिले. त्यावरून मुंबई नाका पोलिस ठाण्यातील गोपनीय विभागाचे अंमलदार ललित केदारे यांनी फिर्याद दाखल केली. या प्रकरणी राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षकांकडे सोपवण्यात आला आहे. तथ्य पडताळून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा:

Back to top button