पाथर्डी बाजार समिती : सभापती, उपसभापतीची माळ कोणाच्या गळ्यात ! | पुढारी

पाथर्डी बाजार समिती : सभापती, उपसभापतीची माळ कोणाच्या गळ्यात !

पाथर्डी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीपदाची निवड प्रक्रिया शनिवारी (दि.20) होत आहे. आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने बाजार समितीच्या 18पैकी 17 जागा मिळवत सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीसाठी खासदार डॉ. सुजय विखे, आमदार राजळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी पाथर्डी बाजार समितीच्या निवडणुकीत प्रचाराची धुरा सांभाळली होती. समितीच्या सभापती व उपसभापतीपदाची निवडणूक शनिवारी होत असून, इच्छुक संचालकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

आमदार राजळे यांच्या सहमतीने पाथर्डी बाजार समितीमध्ये सभापती व उपसभापती ठरला जाऊन या पदावर कोणाची निवड होणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. तालुक्याचे राजकारण मराठा आणि वंजारी समाजा भोवती फिरत असल्याने आजपर्यंतचा इतिहास आहे. अध्यक्षपद मराठा समाजाच्या व्यक्तीला दिले, तर उपाध्यक्षपद वंजारी समाजाच्या व्यक्तीला दिले जाते, असा तालुक्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेचा मागील इतिहास सांगतो.

आगामी काळात तालुक्यात होणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती, पाथर्डी नगरपरिषद व विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राजळे यांना दोन्हीही पदावरच्या निवडी चाणक्शनीतीने जाहीर कराव्या लागणार आहेत. तालुक्यातील तिसगाव, मिरी, करंजीसह 39 गावे राहुरी मतदारसंघाला जोडले आहेत. सभापती व उपसभापती पदावर निवड करून राजळे यांना राजकीय फारसा फायदा होणार नसल्याने कदाचित राजळे या त्या भागातील संचालकाची सभापती व उपसभापतीची निवड करण्याची शक्यता कमी असल्याचे मानले जात आहे. आता, या पदावर राजळे नेमकी कोणाची निवड करणार याकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी सुनील खर्डे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी योगेश नरसिंगपूरकर सभापती व उपसभापती पदाची निवड प्रक्रिया बाजार समितीच्या सभागृहात 20 मे रोजी पार पाडणार आहे.

या नावांची चर्चा, महिलांची नावेही चर्चेत

पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीच्या स्पर्धेमध्ये सुभाष बर्डे, वैभव खलाटे, अजय रक्ताटे, शेषराव कचरे, नारायण पालवे, जगन्नाथ खेडकर, सुनीता कोलते, मधुकर देशमुख, नानासाहेब गाडे यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी रक्ताटे खासदार विखेंचे, तर खलाटे कर्डिलेंचे समर्थक मानले जातात. या व्यतिरिक्त रवींद्र आरोळे, प्रशांत मंडलेचा राजकारणातील ओळखले जाणारे परिचित चेहरे आहेत. महिला प्रतिनिधित्व पाहिले तर बाजार समितीत महिला संचालकी म्हणून सुनीता कोलाते अन् स्मिता लाड निवडून आल्या आहेत.

‘तोच पायंडा पुढे नेणार?’

मागील सत्ताधारी राष्ट्रवादीने सभापतीपद मराठा, तर उपसभापती वंजारी समाजाला दिले होते. माजी आमदार स्व. राजीव राजळे यांनीही सभापतीपद मराठा, तर उपसभापतीपद वंजारी समाजाला दिले होते. आता तोच पायंडा आमदार मोनिका राजळे पुढे घेऊन जाणार का? हे येणार्‍या काही दिवसात कळेल.

Back to top button