कर्नाटक निवडणूक : विधानसभेत मामा, भाचा, बाप लेक; भावांच्या दोन जोड्या एकमेकांविरुद्ध | पुढारी

कर्नाटक निवडणूक : विधानसभेत मामा, भाचा, बाप लेक; भावांच्या दोन जोड्या एकमेकांविरुद्ध

बेळगाव, पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकच्या निवडणुकीने अनेक रंजक निकाल दिले आहेत. बाप आणि मुलगा, बाप आणि मुलगी, मामा-भाचे आणि व्याहीही विधानसभेत निवडून गेले आहेत. निवडणुकीत भावांच्या दोन जोड्या एकमेकांविरुद्धच रिंगणात होत्या. त्यामधील एका जोडीतील एक भाऊ विजयी झाला, तर दुसऱ्या जोडीतील दोन्ही भाऊ पडले आणि तिसराच उमेदवार निवडून आला!

माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी कमी मताधिक्याने चन्नपटण येथून विजय मिळविला; तर त्यांचे भाऊ रेवण्णा यांनीही विजय मिळविला आहे. मुलगा निखिल यांचा पराभव झाला. बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा कायम ठेवणाऱ्या जारकीहोळी बंधूंनी तीन मतदारसंघातून वेगवेगळ्या पक्षांतून विजय मिळविला. यामध्ये सतीश जारकीहोळी यांनी काँग्रेसकडून तर आरभावी आणि गोकाक मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर भालचंद्र जारकीहोळी व रमेश जारकीहोळी विजयी झाले आहेत.

भावांमध्ये लढती

शिमोग्गाच्या सोरब विधानसभा मतदारसंघात बंगारप्पा यांच्या दोन मुलांमध्ये अनेक वर्षांपासून राजकारण रंगत आहे. यावेळी काँग्रेसकडून निवडणूक लढवणाऱ्या मधू बंगारप्पा यांना विजय मिळाला. त्यांचे बंधू कुमार बंगारप्पा यांना पराभव स्वीकारावा लागला. हे दोघे एकमेकांविरुद्ध सोरब मतदारसंघातून लढले होते.

दोन भाऊ, दोन पक्ष, दोन मतदारसंघ

बंगळूर येथील केआरपूर मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर भैरती बसवराज यांनी तर हेब्बाळ मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर भैरती सुरेश यांनी विजय मिळविला आहे.

दोन भाऊ एकमेकांविरुद्ध, दोघेही पराभूत

कौटुंबिक राजकारणाचा फटकाही काहीजणांना बसला आहे. मलिकय्या गुतेदार आणि नितीन गुतेदार यांनी  एकमेकांविरोधात निवडणूक लढवली. यामध्ये दोघांनाही पराभव स्वीकारावा लागला. यात तिसऱ्या उमेदवाराचा फायदा झाला.

व्याहीही विधानसभेत

बेळगाव ग्रामीण विधानसभेच्याआमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विजय मिळविला; तर त्यांचे व्याही बी. के. संगमेश्वर यांनी भद्रावती विधानसभा मतदारसंघातून विजय मिळविला. संगमेश्वर यांची मुलगी हेब्बाळकर यांची सून आहे.

बाप-लेकांच्या चार जोड्या विधानसभेत

राज्यातील राजकारणात सर्वाधिक वयस्कर आमदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ९१ वर्षीय शामनूर शिवशंकरप्पा यांनी दावणगेरी दक्षिण विधानसभा मतदारसंघातून तर त्यांचे पुत्र एस. एस. मल्लिकार्जुन दावणगेरी उत्तर मतदारसंघातून निवडून आले आहेत. दोघेही काँग्रेसच्या उमेदवारीवर रिंगणात . बंगळूर येथील विजयनगर मतदारसंघातून एम. कृष्णप्पा यांनी तर गोविंद- राजनगर मतदारसंघातून त्यांचा मुलगा प्रियाकृष्णा यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढविली. ते दोघेही विजयी झाले. चामुंडेश्वरी मतदारसंघातून जी. टी. देवेगौडा आणि हुनसूर मतदारसंघातून त्यांचा मुलगा जी. डी. हरीषगौड हे दोघेही निजदच्या उमेदवारीवर विजयी झाले. शिवाय दोन वेगळ्या पक्षांकडून आमदार होण्याचा चमत्कारही बाप-लेकांकडून झाला आहे. अरकलगुडू विधानसभा मतदारसंघातून निजदच्या उमेदवारीवर ए. मंजू तर मडीकेरी मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर त्यांचे पुत्र डॉ. मंथरगौडा विजयी झाले.

Back to top button