श्रीगोंदा बाजार समिती : सभापतीसाठी या नेत्यांमध्ये चुरस; 18 रोजी होणार निवड | पुढारी

श्रीगोंदा बाजार समिती : सभापतीसाठी या नेत्यांमध्ये चुरस; 18 रोजी होणार निवड

अमोल गव्हाणे

श्रीगोंदा(अहमदनगर) : श्रीगोंदा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतिपदांच्या 18 मे रोजी होणार्‍या निवडीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. सभापतीपदासाठी अनेक नावे चर्चेत असली, तरी माजी आमदार राहुल जगताप यांच्या मर्जीतीलच बाजार समितीचा सभापती होणार, हे मात्र निश्चित. नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार राहुल जगताप गटाने 18 पैकी 11 जागा जिंकून आपली किमया सिद्ध करून दाखवली. पाचपुते-नागवडे गट एकत्र येऊनही त्यांना सत्तेसाठी लागणारे संख्याबळ गाठता न आल्याने जिल्ह्याच्या राजकीय पटलावर वेगळी चर्चा सुरू आहे.

40 वर्षांपासून तालुक्याच्या राजकारणात सक्रिय असणार्‍या दोन शक्तींना धोबीपछाड देणे नक्कीच डोळ्यांत भरणारी गोष्ट आहे. याच गोष्टीची दखल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी घेत राहुल जगताप यांची रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी नियुक्ती केली. समितीच्या निवडणूक निकालानंतर खासदार सुजय विखे यांनी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्तास्थापनेबाबत सूचक वक्तव्य केले होते. अर्थात राजकारणात अशी भूमिका नेत्यांना घ्यावीच लागते.

सभापती पदासाठी अतुल लोखंडे यांचे नाव प्रामुख्याने चर्चेत आहे. ते राहुल जगताप यांचे खास विश्वासू मानले जातात. मात्र, दुसरीकडे मित्रप्रेमापोटी बाळासाहेब नाहाटा हे साजन पाचपुते यांच्यासाठी प्रयत्न करू शकतात. उपसभापती पदासाठी मनीषा मगर, अजित जामदार यांची नावे चर्चेत आहेत. दुसरीकडे जातीय समतोल राखण्यासाठी दत्तात्रय गावडे यांचीही उपसभापतीपदी निवड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सन 1986 मध्ये श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार स्वतंत्र झाली. पहिले सभापती होण्याचा मान बाबासाहेब इथापे यांना मिळाला. त्यानंतर स्व गुलाबराव वाळुंज, हौसराव भोस, उत्तमराव आधोरे, बाळासाहेब नाहाटा, संजय जमादार, धनसिंग भोयटे यांना सभापतीपदाची संधी मिळाली. मात्र, येळपणे, कोळगाव, मांडवगण गटांना मात्र संधी मिळाली नाही. कदाचित या निवडीत याबाबीचा विचार होऊ शकतो.

सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय

माजी आमदार राहुल जगताप म्हणाले, 18 मे रोजी होणार्‍या पदाधिकारी निवडीत सर्व नेतेमंडळी व संचालकांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार आहोत. कुणाला संधी द्यायची यावर अद्याप चर्चा नाही.

निवडीत कसब पणाला

नूतन संचालकांनी पदाधिकारी निवडीचे सर्वाधिकार राहुल जगताप याना दिले आहेत. खरेदी-विक्री संघ आणि आता बाजार समिती ताब्यात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ मिंळाले आहे. या निवडीत राहुल जगताप यांना राजकीय कसब पणाला लावून सभापती, उपसभापती निवडीला न्याय द्यावा लागणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात आल्यानंतर त्याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर मोठा परिणाम होणार आहे.

नलगे, पानसरे यांची फिल्डिंग

संख्याबळ कमी असल्याने पाचपुते-नागवडे गट पदाधिकारी निवडीत सध्या तरी शांत आहे. मात्र, लक्ष्मण नलगे व दत्तात्रय पानसरे या दोघांनी फिल्डिंग लावली असून, ऐनवेळी नाराज मतदाराला गाठून सत्ता स्थापन करता येते का? याची चाचपणी करीत आहेत.

Back to top button