नाशिक : बंधार्‍यात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ | पुढारी

नाशिक : बंधार्‍यात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्याच्या पूर्व भागातील दुशिंगपूर बंधार्‍यात 32 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. संतोष ऊर्फ माधव अशोक पवार, असे मृत तरुणाचे नाव असून, तो 5 मे पासून घरातून बाहेर पडला होता.

दुशिंगपूर येथे मोठा साठवण तलाव आहे. या तलावाच्या कडेला तरुणाचे कपडे आणि मोबाइल मिळून आल्याने पोलिसांनी त्याचा तलावात शोध घेतला. गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास बंधार्‍यातील पाण्यात मृतदेह आढळून आला. माधव हा तरुण वावीचे माजी सरपंच कन्हैयालाल भुतडा यांच्या शेतात सहकुटुंब वास्तव्याला आहे. तो भुतडा यांच्याकडे ट्रॅक्टरचालक म्हणून काम करतो. 5 मेपासून त्याने सुट्टी घेतली होती. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास बंधार्‍याच्या कडेला पवार याचे कपडे, मोबाइल व चपला आढळून आल्या. वावी पोलिस, स्थानिक तरुणांनी व नातेवाइकांनी बंधार्‍याच्या पाण्यात उतरून माधवचा शोध घेतला. यश न आल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळविले. बुधवारी रात्री अंधार पडल्याने शोधकार्य थांबवण्यात आले. गुरुवारी सकाळी वावी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक चेतन लोखंडे, हवालदार नितीन जगताप, पंकज मोरे, सोपान शिंदे, शैलेश शेलार, पंकज मोंढे यांच्यासह वावी पोलिस पथकाने पुन्हा स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले. दुपारी एकच्या सुमारास मृतदेह आढळून आला. मृत माधव पवार यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. सुरुवातीला मृतदेह दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. त्यानंतर पुन्हा नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या युवकाचा बुडून मृत्यू झाला, आत्महत्या की घातपात आहे याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

शोधकार्यात जीवरक्षक दलाची मदत
सायखेडा येथील जीवरक्षक दलाच्या तुकडी सकाळपासून बंधार्‍यात शोध घेत होती. सिन्नर तालुक्यातील बेलू येथील सराईत पोहणारे तुपेदेखील मदतकार्यात सहभागी झाले.

हेही वाचा:

Back to top button