मुलीवर वारंवार अत्याचार करून तिला ठार मारणार्‍या नराधम भांगेला फाशी देण्याची मागणी | पुढारी

मुलीवर वारंवार अत्याचार करून तिला ठार मारणार्‍या नराधम भांगेला फाशी देण्याची मागणी

राहुरी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : राहुरी येथील पोलिस व महसूल प्रशासनाला सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेने यवतमाळ येथील मातंग समाजातील ऊसतोड कामगाराच्या मुलीवर वारंवार अत्याचार करून तिला ठार मारणार्‍या सुशील भांगे याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, मातंग समाजाची 16 वर्षांची मुलगी यवतमाळ येथील खेड्यातील गरीब कुटुंबातील आहे. ऊसतोड कामगाराची मुलगी पोटाची खळगी भरण्यासाठी ऊस तोडीसाठी कर्नाटक राज्यात जाते. ऊसतोड टोळीचा मुकादम सुशील भांगे (हातगाव डोका केज, ता. बीड) येथे त्याच्या घरी घरकामाला ठेवतो. पीडित मुलीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने घरी आणतो. तिचे आई- वडील पोलिसात तक्रार देण्यास जातात, पण तक्रार घेतली जात नाही.

नराधम पीडित मुलीला हातगाव डोकी, (ता. केज) या ठिकाणी आणून तिच्यावर सुशील भांगे वारंवार तिला डांबून ठेवून तब्बल 6 महिने हा अत्याचार सुरू होता. सुशील भांगे पिडित मुलीला तिच्या बहिणीच्या घरातून जबरदस्तीने हातगाव डोकी, केज येथे आणायचा. ती गर्भवती असल्याची त्याला माहित होते. कुटुंबियांच्या संगनमताने तिची हत्या करून तिला विहिरीत फेकण्यात आले. तिने आत्महत्या केल्याचा बनावर रचण्यात आला. सुशील भांगे याचा चुलत भाऊ गावचा सरपंच असल्याने पोलिसांशी हाथ मिळवणी करून प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप लहुजी सेनेच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे.

यावेळी सत्यशोधक लहुजी क्रांती सेना राहुरी तालुकाध्यक्ष सतीश भांड, शहर प्रमुख विलास जगधने, सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल जगधने, जिल्हाध्यक्ष नंदू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी शहरातून भव्य निषेध रॅली काढून राहुरी पोलिसांना निवेदन देण्यात आले.

Back to top button