पुणे : अखेरच्या श्वासापर्यंत लोककलेची सेवा करणार : ज्येष्ठ लोककलावंत पं. पांडुरंग घोटकर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘मी लौकीक अर्थाने अशिक्षित असूनही केवळ लोककलेच्या जोरावर दिग्गजांसोबत काम करू शकलो आणि त्यांच्याबरोबरीने मैफिली गाजवू शकलो. लोककला ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतिबिंब असून, ती पुढील पिढीपर्यंत गेली पाहिजे. काळाच्या महिम्यामुळे ही कला दोन पावले मागे सरकली असली, तरी मी माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत या लोककलेची सेवा करीत राहीन,’ अशी भावना ज्येष्ठ लोककलावंत पं. पांडुरंग घोटकर यांनी व्यक्त केली.
भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे संस्थेच्या 91 व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या 150 व्या आणि पं. विनायकराव पटवर्धन यांच्या 125 व्या जन्मवर्षपूर्तीनिमित्त आयोजित संगीत महोत्सवात (संगीत समारोह) पं. घोटकर यांच्या ‘महाराष्ट्राचे लोकसंगीत’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
त्या वेळी ‘लोककला’ या वर्गवारीत केंद्र सरकारचा संगीत नाटक अकादमी सन्मान मिळाल्याबद्दल पं. घोटकर यांचा श्रीकांत मराठे आणि नीलिमा मराठे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पं. प्रमोद मराठे, उपप्राचार्या प्रणिता मराठे, मोहन उचगावकर आदी उपस्थित होते. संजय करंदीकर यांनी सूत्रसंचाललन केले. पं. घोटकर यांच्यासह औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘महाराष्ट्राचे लोकसंगीत’ हा कार्यक्रम सादर केला.