सत्ता संघर्षाबद्दल शांतपणे कोर्टाच्या निकालाची वाट बघावी : देवेंद्र फडणवीस | पुढारी

सत्ता संघर्षाबद्दल शांतपणे कोर्टाच्या निकालाची वाट बघावी : देवेंद्र फडणवीस

वर्धा, पुढारी वृत्तसेवा : सत्ता संघर्षाबद्दल सुप्रीम कोर्टाने निर्णय देण्याच्या आधीच राज्यातील काही पॉलिटिकल पंडित आणि काही पत्रकार यांनी निर्णय देऊन टाकला. तसेच त्यावर सरकारही तयार केले. हे योग्य नाही. सुप्रीम कोर्ट हे फार मोठं कोर्ट आहे. शांतपणे निर्णयाची वाट बघावी. आम्ही पूर्णपणे आशादायी आहे. काहीही होणार नाही. आम्ही सगळ कायदेशीर केले आहे. त्यामुळे योग्य निर्णय येईल, अशी आमची अपेक्षा आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

वर्धेत जिल्हा परीषद सभागृहात खरीप हंगामाची आढावा बैठक आयोजित होती. आढावा बैठक संपल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खरीप हंगामाबाबत तयारी चांगली आहे. आवश्यक बियाणे, खताचा साठा उपलब्ध आहे. यावर्षी अल निनो येण्याची शक्यता पाहता कापसाचे क्षेत्र कमी करून सोयाबिन, तुरीच क्षेत्र कसे वाढवता येईल जेणे करून पावसाला विलंब झाला तरी उशिरापर्यंत पेरण्या करता येईल या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. गुलाबी बोंड अळी, किडीचा प्रादुर्भाव होतो, याकरिता कीड रोखण्यासाठी अडीचशे शेती शाळा नियोजित केल्या असून त्यात कीड रोखण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बिबिएफची संख्या वाढवत आहे.

घरगुती बियाण्याची उगवण क्षमता ७५ टक्क्यांवर असल्यास त्याचे प्रमाणीकरण करण्याचा प्रयत्न आहे. बाहेरून घेतलेले बियाण्याची गुणवत्ता तपासणी करावी. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीची पावती जपून ठेवावी. एखाद्या बियाण्यात फसवणुक झाली तर त्याला भरपाई देता येऊ शकते. जलयुक्त शिवार, पांधन रस्ते, मुख्यमंत्री सौर कृषी योजनेचा आढावा घेतल्याचे त्यांनी सांगितले. अनधिकृत बियाणे विकल्यास त्यावर कारवाई केली जाईल. फौजदारी खटला भरला जाईल, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

-हेही वाचा 

नाशिक : जिल्हा बॅंकेसाठीचे एक रकमी कर्जफेड योजनेचे आश्वासन पाळावे; संदीप जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील सरकार बिल्डर आणि कंत्राटदारांचे : आदित्य ठाकरेंचा आरोप

तिकीट तपासनीकांच्या गणवेशावर आता कॅमेरे; सोलापूर रेल्वेला मिळणार ४०० बॉडी कॅमेरे

Back to top button