तिकीट तपासनीकांच्या गणवेशावर आता कॅमेरे; सोलापूर रेल्वेला मिळणार ४०० बॉडी कॅमेरे | पुढारी

तिकीट तपासनीकांच्या गणवेशावर आता कॅमेरे; सोलापूर रेल्वेला मिळणार ४०० बॉडी कॅमेरे

सोलापूर; अंबादास पोळ :  रेल्वेस्थानकात तसेच धावत्या रेल्वेमध्ये जागेवरून वाद होत असतात. अनेकदा प्रवाशांमध्ये हाणामारीच्या घटनाही घडतात. सहप्रवाशांसह तिकीट पर्यवेक्षकांशी (टीसी) अनेकजण भांडतात. यावर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने तिकीट तपासणाऱ्यांच्या खांद्यावर (गणवेशावर) कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वे विभागाकडून सध्या मुंबईतील तिकीट पर्यवेक्षकांना ५० कॅमेरे दिले असून त्या पार्श्वभूमीवर सोलापूर विभागातही ४०० बॉडी कॅमेरे खरेदी केले जाणार आहेत. हे कॅमेरे स्थानकावरील व धावत्या रेल्वेतील तिकीट पर्यवेक्षकांना दिले जाणार आहेत. यामुळे आता विनाकारण वाद घालणाऱ्या, भांडण करणाऱ्या प्रवाशांचे सहज चित्रण होणार असून त्याद्वारे अशा प्रवाशांवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे रेल्वेमध्ये वाद घालणे महागात पडू शकते. बॉडी कॅमेरे हे तिकीट पर्यवेक्षकांच्या शर्टच्या कॉलरजवळ (खांद्यावर) लावले जाणार आहेत

तिकीट पर्यवेक्षकांना देण्यात येणारे कॅमेरे १२ मेगा पिक्सलचे असून सलग ३० तास ते कार्यरत राहू शकतात. यावेळी प्रवाशांमध्ये एखादा अनुचित प्रकार घडल्यास नेमकी कुणाची बाजू योग्य आहे, हे समजत नाही. त्यामुळे अशाप्रसंगी झालेले चित्रीकरण महत्त्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाऊ शकते… यासह रेल्वेत अथवा रेल्वेस्थानकावर एखादी घटना घडल्यास त्याचे चित्रीकरणदेखील होऊ शकते. अशा पद्धतीचे कॅमेरे रेल्वे सुरक्षा जवानांनाही देण्याचे रेल्वे प्रशासनाचे प्रयोजन आहे.

Back to top button