नाशिक : जिल्हा बॅंकेसाठीचे एक रकमी कर्जफेड योजनेचे आश्वासन पाळावे; संदीप जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी | पुढारी

नाशिक : जिल्हा बॅंकेसाठीचे एक रकमी कर्जफेड योजनेचे आश्वासन पाळावे; संदीप जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

पालकमंत्री दादा भुसे व सहकार मंत्री अतुल सावे या आपल्या दोन मंत्र्यांनी नाशिक जिल्हा बॅंकेसाठी दिलेले एक रकमी कर्जफेड योजनेचे आश्वासन पाळावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली.

आज सह्याद्री अतिथी गृहामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री दादा भुसे तसेच किसान संघटनेचे नेते विनायकराव पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, सिकंदर शहा, संदीप उफाडे व इतर काही शेतकरी प्रतिनिधी यांची विविध विषयांवर बैठक मुख्यमंत्र्यांनी आयोजित केली होती. या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर असणाऱ्या प्रश्नांवर दीड तास साधक-बाधक चर्चा झाली. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी. उसाला एक रकमी भाव मिळावा. सौरऊर्जेचे अनुदान प्रत्येक शेतकऱ्याला सुलभ मिळावे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा व नुकसान भरपाई तात्काळ शेतकऱ्यांना मिळावी या विषयावर मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत शेतकरी प्रतिनिधी व मंत्रिमंडळाची चर्चा झाली.

या चर्चेत राज्यभरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष संदीप जगताप यांनी नाशिक जिल्हा बँकेचा प्रश्न जोरदारपणे लावून धरला. दादा भुसे यांच्या घरावर निघालेल्या राजू शेट्टी यांच्या नेतृत्वातील बिऱ्हाड आंदोलनाची आठवण मुख्यमंत्र्यांना करून दिली. व या आंदोलनामध्ये पालकमंत्री दादा भुसे व सहकार मंत्री अतुल सावे यांनी शेतकऱ्यांना नवी ओटीएस योजना देण्याचे जे आश्वासन दिले होते ते आश्वासन अजून सरकारने पूर्ण केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. याची जाणीव करून दिली व आपल्या दोन जबाबदार मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन आपल्या सरकारने पाळावे असा आग्रह धरला.

तसेच या बैठकीत संदीप जगताप यांनी राज्यभरातील बीडिओ हे एका सरपंचांने भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर आणले म्हणून संपावर आहे. शेतकऱ्यांची काम ते जाणीवपूर्वक करत नाही त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अथवा त्यांचा संप मिटवावा. अशी मागणी देखील संदीप जगताप यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या सचिवांना दिले.

आजच्या सह्याद्री अतिथिगृहातील बैठकीत मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांसोबत राज्यभरातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. नाशिक जिल्हा बँकेचा विषय सुद्धा मी जोरकस पणे मांडला. तसेच राज्यभरातील बीडिओ आडमुठेपणाने शेतकऱ्यांची काम अडवत आहे.त्यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा त्यातून मार्ग काढावा ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे लावून धरली. मुख्यमंत्र्यांनी त्यावर सकारात्मकता दाखवली आहे. जिल्हा बँकेचा विषय सुद्धा मार्गी लागावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्तरावरून सतत प्रयत्न करत राहील.

– संदीप जगताप
प्रदेशाध्यक्ष , स्वाभिमानी शेतकरी संघटना

हेही वाचा :

Back to top button