नाशिक : सुरगाणा पोलिसांची वाहनाअभावी पायपीट | पुढारी

नाशिक : सुरगाणा पोलिसांची वाहनाअभावी पायपीट

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा

येथील पाेलिस ठाण्यातील सेवकांना गस्त व इतर कामांसाठे वाहन मोडकळीस आलेले असून, या वाहनाने चोरट्यांचा पाठलाग करणे दूरच भररस्त्यातच वाहन नादुरुस्त झाल्यास पोलिसांना पायपीट करण्याची वेळ येते. त्यामुळे या वाहनाऐवजी पाेलिस ठाण्याला नूतन वाहन देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

कायदा व सुव्यवस्थेच्या समस्या हाताळणे, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी बंदोबस्त राखणे आणि पोलिसांचे सामान्य कामकाज या सगळ्यांसाठी खात्रीशीर वाहनांची गरज नेहमीच भासते. मात्र, अशा परिस्थितीत सुरगाणा पाेलिस ठाण्याच्या वाहनाची स्थिती दयनीय झाली आहे. याबाबत वरिष्ठ पाेलिस अधिकार्‍यांनी तत्काळ वाहनाची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. सुरगाणा पाेलिस ठाण्याच्या अंतर्गत जवळपास ५० ग्रामपंचायती आणि १५० महसुली गावांचा समावेश होतो. यासाठी सेवकांना वाहन कमी पडत आहे. हे वाहन केव्हाही व कधीही बंद पडते. त्यामुळे पोलिसांच्या कामात व्यत्यय निर्माण होतो. महत्त्वाच्या कामाला या वाहनाचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे येथील सेवकांना खासगी वाहनाचा उपयोग करावा लागतो. धावत्या व डिजिटल युगात अशा पद्धतीचे वाहन असल्यास पोलिसांच्या हाती गुन्हेगार कसे लागतील, असा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे पाेलिस अधीक्षकांनी याबाबत विचार करून पाेलिस ठाण्याला नवीन वाहन द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

अपघाताची भीती
पाेलिस ठाण्यातील सेवकांना सर्वच कामांसाठी हे एकमेव वाहन असल्याने त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे या वाहनाचे सर्वच भाग खिळखिळे झाल्याचे दिसून येते. कामाच्या वेळी हे वाहन कुठेही बंद पडत असल्याने सेवक हे वाहन चालवण्याकडे काणाडोळा करतात. मात्र, गरजेच्या वेळी सेवकांना जीव धोक्यात घालून वाहन चालवावेच लागते. या वाहनाचा अपघात होऊन जीवितहानी होण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा:

Back to top button