कर्नाटकातील मराठी माणसाने ‘जय भवानी-जय शिवाजी’ म्हणत मतदान करावे – उद्धव ठाकरे | पुढारी

कर्नाटकातील मराठी माणसाने 'जय भवानी-जय शिवाजी' म्हणत मतदान करावे - उद्धव ठाकरे

पुढारी ऑनलाइन डेस्क : कर्नाटकातील मराठी माणसाने जय भवानी जय शिवाजी असे म्हणत मतदान करावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. कर्नाटकात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बजरंग बली की जय’ असे म्हणत तुम्ही मतदान करा, असे म्हटले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकातील मराठी माणसाने जय भवानी जय शिवाजी म्हणत महाराष्ट्र एकीकरण समितीला मतदान करावे, असे म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा प्रचार केल्याच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगाने त्यावेळी त्यांचा मतदानाचा अधिकार रद्द केला होता. मात्र, आता पंतप्रधान मोदी स्वतः प्रचारादरम्यान जय बजरंगबली असे म्हणत मतदान करा असे म्हणत आहेत. तर तो कायदा बदलला गेला का? असा प्रश्न विचारला.
त्यावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आता बजरंग बली की जय असे म्हणत आहेत. त्यामुळे तो कायदा बदलला असावा मात्र, बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार त्यावेळी काढून घेण्यात आला होता ही आठवण त्यामुळे जागी झाली.

तसेच यावेळी ते म्हणाले कर्नाटकातील मराठी बांधवांनी तुमच्यावर भाषिक अत्याचार होत असेल तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय किंवा जय भवानी-जय शिवाजी, असे म्हणत महाराष्ट्र एकीकरण समितीला मत द्या, असे म्हटले आहे. तसेच जय बजरंग बली हे चांगलेच आहे, मात्र बजरंग बली स्वतः बलशाली आहेतच तुम्ही तुमचे बल दाखवा असाही टोला त्यांनी भाजपला लगावला. किंवा भाजप काँग्रेस दोघांनी स्वतःचे बल दाखवावे, असे ते म्हणाले.

पवार यांना मी कसा सल्ला देणार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून राजीनामा दिला त्यानंतर तुम्ही त्यांची अद्याप भेट घेतली नाही. यावर बोलताना उद्धव म्हणाले, प्रत्येक पक्षाला पक्षांतर्गत व्यवस्थापन काय असावे याचा निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाच्या अध्यक्षाला असतो. त्यामुळे मी त्याबाबत बोलणार नाही. मात्र महाविकास आघाडीवर याचा परिणाम होणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. राहिला प्रश्न भेटीचा तर अद्याप त्यांच्या निर्णयावर चर्चा सुरू आहे, तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. त्यामुळे मी अद्याप शरद पवार यांच्याशी बोललो नाही. तसेच त्यांनी काय निर्णय घ्यायचा किंवा त्यांना मी कसा सल्ला देणार, असे देखील ते म्हणाले.

पवार यांच्या आत्मचरित्रात त्यांनी तुम्ही केवळ दोनदा मंत्रालयात आला हे आम्हााल पटले नाही असा उल्लेख केला आहे, त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, प्रत्येकाला आत्मचरित्रात हे सांगण्याचा बोलण्याचा अधिकार नसतो. मी मंत्रालयात किती वेळा आलो यापेक्षा मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला मी त्यांच्या घरातील सदस्य वाटलो हे माझ्यासाठी महत्वाचे आहे.

मी मोदींच्या नव्हे तर हुकुमशाही वृत्तीच्या विरोधात

लोकसभा निवडणुका जवळ आहेत त्यामुळे मोदींच्या पराभवासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याबाबत एका पत्रकाराने विचारले असता त्याला मध्येच थांबवत उद्धव ठाकरे म्हणाले मी मोदींच्या नव्हे तर हुकुमशाही वृत्तीच्या विरोधात आहे. देशात हुकुमशाही वाढली आहे. त्यामुळे हुुकुमशाही विरोधात केवळ विरोधी पक्षांनीच नव्हे तर देशाच्या सगळ्या जनतेने एकत्र यायला हवे, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

 

Back to top button