पुण्यातील बिल्डर पुन्हा आयकर विभागाच्या रडारवर, पिंपरी चिंचवडतील तीन बांधकाम व्यवसायिकांवर छापेमारी | पुढारी

पुण्यातील बिल्डर पुन्हा आयकर विभागाच्या रडारवर, पिंपरी चिंचवडतील तीन बांधकाम व्यवसायिकांवर छापेमारी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  आर्थिक गैव्यवहारप्रकरणी अनियमिततेचा ठपका ठेवून पिंपरी चिंचवड येथील भागीदार असलेल्या तीन मोठ्या बिल्डरांवर आयकर विभागाने गुरुवारी (दि.४) सकाळी छापेमारी केली. साखर झोपेत असतानाच चार वेगवेगळ्या वाहनातून आलेल्या अधिकाऱ्यांनी बिल्डरांच्या घरावर ताबा घेऊन नंतर एकाचवेळी कार्यालयावर धाड मारली. पथकाने काही महत्वाच्या कागदपत्रांसह संगणकाचे हार्डडिस्क व काही डायरी जप्त केले असल्याचे समजते. गुरुवारी (दि.४) पहाटे पाच ते सहा वाजेदरम्यान पुण्याच्या पिंपरी चिंचवड परिसरातील सिंध सोसायटीसह पिंपरी चिंचवड येथील तीन बांधकाम व्यावसायिकांच्या बंगल्याचा ताबा घेतला.

पोलीस बंदोबस्तात सोसायटीमध्ये आलेल्या अधिकाऱ्यांनी अत्यंत गोपनीयतेने कारवाई केली. एकाचवेळी तीन भागीदारांनी मिळून उभ्या केलेल्या मोठ्या कंपनीच्या बिल्डरांवर एकाचवेळी छापे टाकण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला बिल्डरांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. आयकर विभागाची पोलिस बंदोबस्तात कारवाई असून विरोध केल्यास गुन्हा दाखल करून झाडाझडती घेतली जाईल असा दम भरताच बिल्डरांनी पथकास सहकार्य करीत कार्यालयावर घेऊन गेले. घरातील कारवाईनंतर दोन बिल्डरांच्या घरातील काही बॉण्ड्स व रजिस्टर ताब्यात घेण्यात आले असून काही रोख रक्कमही हाती लागली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या रकमेबाबत तिन्ही भागीदार पुरावे सादर करत नाही तोपर्यंत ती रक्कम आयकर विभाग ताब्यात ठेवणार असल्याचे समजते. दरम्यान पथकातील काही अधिकाऱ्यांनी बिल्डरांच्या कार्यालयावर मोर्चा वळवला अन् झडती घेतली असता अनेक संशयास्पद आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे सापडली असल्याचे समजते. ही सर्व कागदपत्रे व संगणकातील हार्डडिस्क जप्त करण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आयकर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण कागदपत्रांची छाननी केल्यानंतर आर्थिक ताळमेळ न बसल्यास संबंधित बिल्डरांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. दरम्यान या कारवाई संदर्भात बिल्डरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना बोलू न देण्यात आले.

Back to top button