पिंपरी-चिंचवड शहरात बोअरवेल आटले सोसायट्यांमध्ये वाढल्या टँकरच्या फेर्‍या | पुढारी

पिंपरी-चिंचवड शहरात बोअरवेल आटले सोसायट्यांमध्ये वाढल्या टँकरच्या फेर्‍या

दीपेश सुराणा :

पिंपरी :  पिंपरी-चिंचवड शहराची सध्याची लोकसंख्या सुमारे 30 लाखांच्या पुढे आहे. या लोकसंख्येस पालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो; मात्र, सध्याचा पाणीपुरवठा शहरास अपुरा होत आहे. सद्यस्थितीत शहराच्या अनेक उपनगरांतील नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. स्मार्ट सिटी असूनही पिंपरी-चिंचवडवासीयांना सध्यातरी दिवसाआड पाणी मिळत असल्याचे वास्तव आहे.

शहरातील विविध सोसायट्यांमध्ये असणार्‍या बोअरवेल सध्या आटल्या आहेत. त्यामुळे सोसायट्यांची टँकरची मागणी वाढली आहे. सोसायट्यांना सध्या दिवसाला सरासरी 5 ते 10 टँकर इतके पाणी लागत आहे. पर्यायाने, सोसायट्यांना पाण्यावर दरमहा लाखो रुपये खर्च करावे लागत आहे. त्यामुळे टँकरमाफियांचे मात्र फावले असून त्यांची कमाई जोरात सुरू आहे.

वाकड, पिंपळे सौदागर, रावेत, रहाटणी, पुनावळे, चर्होली, डुडुळगाव आदी परिसरातील सोसायट्यांमध्ये सध्या दररोज 5 ते 10 टँकर सुरू आहेत. येथील मोठ्या सोसायट्यांमध्ये तर, दररोज 20 टँकरदेखील पाणी घ्यावे लागत आहे. त्याचप्रमाणे, चिखली परिसरातील चिखली गावठाण, बगवस्ती, नेवाळेवस्ती, मोरेवस्ती आदी भागांमध्ये दररोज सरासरी 10 टँकर मागवावे लागत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने प्रामुख्याने ही समस्या निर्माण झाली आहे.

महापालिकेकडून शहरात सध्या दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे, तर एमआयडीसीकडून 30 एमएलडी पाणी देण्यात येत आहे. शहराची लोकसंख्या सध्या 27 लाखांवर जाऊन पोहोचली आहे. लोकसंख्या वाढत असताना पाण्याचा कोटा मात्र अद्याप वाढलेला नाही. आंद्रा धरणातून देण्यात येणार्या अधिकच्या 100 एमएलडी पाण्यासाठी चाचणी करण्याचेच काम सध्या सुरू आहे.

बोअरवेल आटल्या, पाण्याची मागणी वाढली
वाकड, पिंपळे सौदागर, रावेत, रहाटणी, चिखली, पुनावळे, चर्होली, डुडुळगाव अशा विविध भागांतील सोसायट्यांमध्ये असलेल्या बोअरवेल सध्या आटल्या आहेत. त्यामुळे येथील सोसायट्यांना वापरासाठी आवश्यक पाण्याची गरज भागविण्यासाठी टँकरशिवाय पर्याय राहिलेला नाही. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यापासूनच सोसायट्यांमध्ये टँकर सुरू झाले आहेत. सुरुवातीला टँकरचे प्रमाण कमी होते. मात्र, आता टँकरची मागणी वाढली आहे.

सोसायट्यांची गरज भागणार कधी?
शहरातील विविध भागांमध्ये नागरीकरणाचा वेग वाढला आहे. महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांमध्ये नवीन गृहप्रकल्पांची कामे वेगात सुरू आहे. पर्यायाने, नागरिकांची पाण्याची गरजही वाढली आहे. महापालिकेकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पुरेसा ठरतो. मात्र, वापरण्याच्या पाण्यासाठी शहराच्या विविध भागातील सोसायट्यांना सध्या टँकर मागवावे लागत आहे. छोटी सोसायटी असल्यास त्यांना दिवसाला 5 टँकर पुरेसे होतात. मात्र, मोठी सोसायटी असल्यास त्यांना दररोज किमान 10 टँकर इतके पाणी लागत आहे.

पाण्यासाठी लाखोंचा खर्च
उन्हाळ्यातील पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता सध्या एका सोसायटीला जर दररोज 5 टँकर लागत असतील तर त्यांना महिन्याला सरासरी 150 टँकर लागतात. पाण्याचा एक टँकर मागविण्यासाठी सरासरी 800 ते 1200 रुपये मोजावे लागतात. एका टँकरची सरासरी किमत 1 हजार रुपये पकडल्यास सोसायटीला महिन्याला दीड लाख रुपये इतका खर्च येत आहे. छोट्या सोसायट्यांतील ही स्थिती आहे. मात्र, मोठ्या सोसायट्यांमध्ये दिवसाला तब्बल 10 टँकर लागत आहे. त्यांना दरमहा येणारा खर्च हा जवळपास 3 लाख इतका आहे.

अधिकच्या पाण्यासाठी ‘तारीख पे तारीख’
शहरासाठी आंद्रा धरणाचे 100 एमएलडी पाणी इंद्रायणी नदीतून उचलले जाणार आहे. त्यासाठी चिखली येथे जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी, जलवाहिन्या टाकणे अशी सर्व कामे पूर्ण झाली आहेत. सध्या या पाण्याची चाचणी केली जात आहे. हे पाणी शहरवासीयांना देण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून केवळ ‘तारीख पे तारीख’ पडत आहे. मात्र, अधिकचे पाणी मिळत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.

रावेत जलउपसा केंद्र येथे सध्या खंडित वीजपुरवठ्याची समस्या जाणवत आहे. त्यामुळे शहरासाठी कमी प्रमाणात पाणी उचलले जात आहे. शहराला अधिकचे पाणी मिळावे, यासाठी आंद्रा धरणाचे इंद्रायणी नदीतून 100 एमएलडी पाणी उचलले जाणार आहे. त्यासाठी सध्या चाचणी सुरू आहे. मोठ्या सोसायट्यांनी सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या माध्यमातून प्रक्रिया करून वापरासाठी सांडपाण्याचा पुनर्वापर करावा. तसेच, रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा उभारून पावसाचे पाणी साठविले पाहिजे.
                                     – श्रीकांत सवणे, सह-शहर अभियंता, महापालिका.

पिंपळे सौदागर, रावेत, वाकड, रहाटणी, पुनावळे आदी परिसरातील सोसायट्यांमध्ये प्रत्येक सोसायटीनिहाय दररोज 5 ते 10 टँकर पाणी मागविले जात आहे. पाण्यासाठी सोसायट्यांचा दरमहा 2 ते 3 लाख रुपये इतका खर्च होत आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये पाणीप्रश्नावर दाखल याचिकेत न्यायालयाने समिती बनवून हा प्रश्न सोडविण्याचे आदेश महापालिकेला दिलेले आहेत. महापालिकेने नागरिकांनी पुरेसे पाणी देणे गरजेचे आहे.
                   -दत्तात्रय देशमुख, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशन.

चिखली, चर्होली, डूडूळगाव आदी परिसरात सध्या टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. दररोज प्रत्येक सोसायटीनिहाय सरासरी 10 टँकरची मागणी आहे. चिखली, मोशी, डुडुळगाव, बोर्होडेवाडी, चर्होली आदी परिसरातील सुमारे 2 हजार सोसायट्यांपैकी 500 सोसायट्यांना पाणीप्रश्न जाणवत आहे. पाण्यावर होणार्या लाखो रुपयांच्या खर्चाची भरपाई महापालिकेने सोसायटीधारकांना द्यायला हवी. आंद्रा धरणाचे 100 एमएलडी पाणीदेखील लवकर मिळावे.
-संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली मोशी- पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशन.

Back to top button