नाशिक क्राईम : एकावर प्राणघातक हल्ला | पुढारी

नाशिक क्राईम : एकावर प्राणघातक हल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून ३२ वर्षीय व्यक्तीने तिडके कॉलनी परिसरात एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी अमोल भाऊसाहेब शिंदे (३३, रा. कामगारनगर, सातपूर) यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात संशयित दीपक बिपीन सिंग (३२, रा. दत्तनगर, अंबड) विरोधात फिर्याद दाखल केली आहे. अमोलच्या फिर्यादीनुसार, तो निओ केअर रुग्णालयात असताना तेथे काम करणाऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय दीपकला आला. त्यामुळे दीपकने सोमवारी (दि.१) सकाळी १० वाजता अमोलला रुग्णालयात गाठून त्यास शिवीगाळ, दमदाटी करून धारदार शस्त्राने वार केले. यात अमोल गंभीर जखमी असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी संशयित दीपकला अटक केली आहे.

वरिष्ठ तंत्रज्ञास मारहाण

नाशिक : महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञास एकाने मारहाण केल्याची घटना महात्मा गांधी रोडवर घडली. परशुराम जी. पाडवी (३१, रा. ता. निफाड) यांच्या फिर्यादीनुसार, ते त्यांच्या सहकाऱ्यांसह अनारकली शॉप येथे मंगळवारी (दि.२) सकाळी १०.१५ वाजता सरकारी काम करत असताना संशयित धनंजय खैरनार याने शिवीगाळ करीत मारहाण केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात धनंजयविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्थिक कारणावरून एकास मारहाण

नाशिक : आर्थिक कारणावरून दोघांनी मिळून एकास बेदम मारहाण केल्याची घटना द्वारका परिसरात घडली. उबेद शब्दार शेख (२८, रा. नाईकवाडी पुरा) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित नईम शेख व सयदाद खान यांनी सोमवारी (दि.१) रात्री आर्थिक कारणावरून कुरापत काढून लोखंडी रॉडने मारहाण करीत दुखापत केली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणराज कॉलनीत घरफोडी

नाशिक : इंदिरानगर येथील गणराज कॉलनीत २८ एप्रिल ते १ मे दरम्यान चाेरट्याने घरफोडी करून तीन लाख २७ हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास केला. नितीन दत्तात्रय वडगावकर यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने घरफोडी करून घरातील सोन्या-चांदीचे दागिने, मूर्ती, रोकड असा ऐवज लंपास केला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मद्यसाठा जप्त

नाशिक : जेलरोड येथील सैलानीबाबा बसथांबा परिसराजवळून पोलिसांनी एकास ताब्यात घेत त्याच्याकडून २,४०० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. गोविंद शिंदे (रा. जेलरोड) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने मंगळवारी (दि.२) दुपारी कारवाई करीत देशी मद्यसाठा जप्त केला आहे. गोविंदविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button