Dinesh Karthik : दिनेश कार्तिक आरसीबीसाठी अडचण? इरफान पठाणने केली हकालपट्टी करण्याची मागणी | पुढारी

Dinesh Karthik : दिनेश कार्तिक आरसीबीसाठी अडचण? इरफान पठाणने केली हकालपट्टी करण्याची मागणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या (IPL 2023) या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या संघाने आपल्या चाहत्यांना निराश केले आहे. आरसीबीला आतापर्यंत केवळ चार सामने जिंकता आले आहेत. यादरम्यान, आरसीबीला मधल्या फळीमुळे पराभवाचा सामना करावा लागत आहे, असा आरोप माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने (Irfan Pathan)  केला आहे. तसेच दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) मागील आठ सामन्यांबद्दल बोलताना त्याने त्याला हटवण्याची मागणी केली आहे.

लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमवर झालेल्या कमी धावसंख्येच्या आयपीएल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने लखनौ सुपर जायंटस्वर १८ धावांनी विजय मिळवला. RCB ने आतापर्यंत केवळ चार सामने जिंकले आहेत. या हंगामात बंगळुरूच्या मधल्या फळीने ८ सामन्यात केवळ ४०४ धावा केल्या आहेत. १० फ्रँचायझींमधील हा आतापर्यंतचा सर्वात कमी स्कोर आहे. RCB च्या या कामगिरीवर बोलताना इरफान पठाणने दिनेश कार्तिकवर हल्ला चढवला आहे.

चाहत्यांना गेल्या वर्षी कार्तिकचे (Dinesh Karthik) वेगळे रूप पाहायला मिळाले होते. त्याने आपल्या फिनिशिंग क्षमतेने क्रिकेट तज्ञ आणि भारताच्या निवडकर्त्यांनाही आश्चर्यचकित केले होते. त्याची क्षमता पाहून त्याचे पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन झाले. यानंतर त्याला टी-20 विश्वचषक संघातही स्थान देण्यात आले. तथापि, २०२३ मध्ये कार्तिकला खूप संघर्ष करावा लागत आहे. मधल्या फळीत ४०४ धावा करताना कार्तिकने ७ सामन्यात केवळ ८३ धावा केल्या आहेत. या हंगामात किमान ५० चेंडू खेळलेल्या मधल्या फळीतील फलंदाजांमध्ये त्याची १३.८३ ची सरासरी सर्वात वाईट आहे.

दिनेश कार्तिकला हटवण्याची इरफानची मागणी

इरफान पठाण (Irfan Pathan)  म्हणाला की, “जर कोहली, ग्लेन आणि डुप्लेसिस चांगली कामगिरी करू शकले नाहीत, तर संपूर्ण संघाला कोण वाचवणार याचा आरसीबीला उपाय शोधावा लागेल. आरसीबीची मधली फळी खूपच कमकुवत दिसत आहे. कार्तिक ८ सामन्यांत एकदाही स्वत:ला सिद्ध करू शकला नाही. आरसीबी व्यवस्थापनाला त्याच्या फलंदाजीतील ही त्रुटी दूर करावी लागेल.”

हेही वाचा : 

Back to top button