जळगाव जिल्ह्यात सूर्य ओकतोय आग; तापमानाची चाळीशी | पुढारी

जळगाव जिल्ह्यात सूर्य ओकतोय आग; तापमानाची चाळीशी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील तापमानाने चाळीशी कधीच ओलांडली आहे. मंगळवारी आज (दि.१८) जळगाव व भुसावळचे तापमान ४५ अंश असल्याची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या तापमानामुळे रात्री नऊपर्यंत उन्हाच्या झळा सुरू असल्याने वृध्दांसह सर्वांनाच उन्हाचा त्रासामुळे जीवाची लाही लाही होत असल्याचे चित्र आहे.

जळगाव जिल्हा तापमानाच्‍या बाबतीत हॉट समजला जातो. दरवर्षी मे महिन्‍यात ४५ ते ४८ अंशापर्यंत येथील तापमान जाते. यंदा मात्र एप्रिल महिन्यातच तापमानाने ४५ अंशापर्यंत मजल मारली आहे. जिल्ह्यात आठवडाभरापासून सूर्य अधिक तापत असून आता जणू काही आगच ओकू लागला आहे. यामुळे वैशाखाचा वणवा पेटू लागल्‍याचा भास होत आहे. सकाळी दहापासूनच उन्हाचे असह्य चटके बसत आहे. उन्हाच्या असह्य झळांनी नागरिकांची चांगलीच होरपळ होत आहे.

उन्हामुळे रस्ते निर्मुनष्य…
मंगळवारी (दि.१८) सकाळपासूनच उन्हाचे असह्य चटके जाणवत होते. दुपारी उन्हाच्या चटक्यांमुळे काही रस्ते निर्मुनष्य झाले. नागरिक बाहेर पडतांना डोक्यावर रुमाल, गॉगल, महिला सनकोट, स्कार्फ बांधूनच बाहेर पडत आहे. उन्हापासून सुटका मिळण्यासाठी शितपेयांच्या गाडीवर गर्दी दिसून आली. ममुराबाद तापमान केंद्रावर ४२.४ अंश तापमानाची नोंद झाली. किमान तापमान २३.७ अंश होते. तापमान अभ्यासक नीलेश गोरे यांच्या ‘वेलनेस’ने जळगावचे तापमान ४५ अंश नोंदले आहे. एकंदरीत जळगाव जिल्‍ह्यातील सर्वच शहरातील तापमान हे चाळीशीच्या पार गेले आहे.

मंगळवारी (दि.१८) दुपारी अडीच ते चार दरम्यान जिल्ह्यातील तापमान असे…
जळगाव- ४५ अंश, भुसावळ- ४५ अंश, अमळनेर- ४४, बोदवड- ४३, भडगाव- ४४, चोपडा -४३, चाळीसगाव- ४२, धरणगाव ४३, एरंडोल- ४४, फैजपूर – ४४, जामनेर- ४५, मुक्ताईनगर- ४४, पारोळा -४३, पाचोरा – ४३,रावेर- ४४, वरणगाव- ४५, यावल, ४३ अंश सेल्सिअस तापमान होते.

ही सीजनल उष्णतेची लाट आहे. भारतात विविध ठिकाणी विशेषतः उत्तर भारतात उष्ण वारे वाहत आहेत. त्यामुळे त्या भागात देखील उष्णतेची लाट आहे. या सर्वांचा प्रभाव आपल्याकडेही होत आहे. येत्या २१ एप्रिलपर्यंत अशी स्थिती राहण्याची शक्यता आहे. दि. १७ एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्याचे तापमान ४४.२ डिग्री सेल्सिअस वर येऊन ठेपले होते. तर दि. १८ एप्रिलला ४५ अंश, एप्रिलपर्यंत अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. दि. २१ एप्रिल दुपारनंतर विविध ठिकाणी ढगाळ वातावरण निर्मिती होण्याची शक्यता आहे. तसेच दि. 23 एप्रिल पर्यंत विविध ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. तसेच दि. 21 ते 23 तापमानात अल्प घट होण्याची शक्यता आहे. मात्र दि. 24 तारखेपासून पुन्हा तापमानात मोठी वाढ होण्याचे संकेत आहे. – निलेश गोरे, तापमान अभ्यासक, वेलनेस वेदर भुसावळ.

हेही वाचा:

Back to top button