धुळे : मेणबत्तीच्या कारखान्यात स्फोट; चार महिलांचा मृत्यू तर दोन गंभीर | पुढारी

धुळे : मेणबत्तीच्या कारखान्यात स्फोट; चार महिलांचा मृत्यू तर दोन गंभीर

धुळे : पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यात वासखेडी ते चिपलीपाडा दरम्यानच्या शेतात असणाऱ्या मेणबत्तीच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात जैताने येथील चौघा महिला होरपळून ठार झाल्या. मयतांमध्ये माय लेकीचा समावेश आहे. तर दोघांची स्थिती गंभीर असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. या कारखान्यांमध्ये वाढदिवसासाठी वापरल्या जाणाऱ्या शोभेच्या मेणबत्ती तयार करण्यात येत होत्या. यात स्फोटकांचा वापर केला जात असल्याचा संशय असून त्या दृष्टीने आता तपास सुरू झाला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली आहे.

साक्री तालुक्यामध्ये एका शेतात मेणबत्ती तयार करण्याचा हा कारखाना सुरू करण्यात आला होता. वाढदिवसासाठी आकर्षक रोषणाई करण्याच्या दृष्टीने या मेणबत्तींमध्ये स्फोटकांचा वापर केला जात असल्याची माहिती पुढे येते आहे. या कारखान्यांमध्ये आज (दि.१८) दुपारी दोनच्या सुमारास अचानक स्फोट झाला. यावेळी कारखान्यात सहा महिला काम करत होत्या. अचानक झालेल्या स्फोटामुळे आग भडकल्यामुळे या महिलांना बाहेर निघणे अवघड झाले. यात महिला होरपळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मृतांमध्ये जैताने येथे राहणाऱ्या आशाबाई भैय्या भागवत (वय ३५ ), पुनम भैय्या भागवत (वय १५ ), नयना संजय माळी (वय ४५ )आणि सिंधुबाई राजपूत (वय ५६) यांचा समावेश आहे. यातील आशाबाई भागवत आणि पूनम भागवत या मायलेकी आहेत. तर गंभीर भाजलेल्या अवस्थेत संगीता चव्हाण आणि निकिता महाजन या दोघींना तातडीने नंदुरबार येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.  स्फोटाची माहिती मिळाल्याने तहसीलदार आशा गांगुर्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप महीराळे तसेच निजामपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. तत्पूर्वी ही माहिती साक्री येथील अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आली. त्यामुळे अग्निशमन दलाचे बंब देखील घटनास्थळी दाखल झाले. मात्र, साक्री ते घटनास्थळ हे अंतर लांब असल्यामुळे बंब येण्यास उशीर झाला.

दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी हा कारखाना विनापरवानगीने चालवला जात असल्याचा आरोप केला आहे. तर कारखान्यात मोठ्या प्रमाणावर स्फोटके ठेवण्यात आली. त्यामुळेच आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी देखील या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आश्वासन दिले आहे. कारखान्यांमध्ये वाढदिवसासाठी फुलझडी प्रमाणे वापर होणारी मेणबत्ती तयार होत होती. पण यात स्फोटके कशाप्रकारे वापरली जात होती, याचा तपास केला जाणार आहे. या प्रकरणांमध्ये एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.   यासंदर्भात निजामपूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.

हेही वाचा:

Back to top button