

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. काही भागांतून पाण्याच्या तक्रारी येत आहेत. पाण्याचा अपव्यय होऊ नये, यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. पिण्याचा पाण्याचा अतिरिक्त वापर करणारे तसेच, वाहन, अंगण, रस्ते व पार्किंग धुणे, बाग व झाडांना पाणी घालणे, मैदानात पाणी मारणे, वॉशिंग सेंटर व बांधकामांसाठी पिण्याचे पाणी वापरल्यास कारवाई करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागास देण्यात आले आहेत, असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी सांगितले.
शहराला मावळ तालुक्यातील पवना धरणामधून पाणीपुरवठा केला जातो. शहरामध्ये गेल्या साडेतीन वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. धरणातील पाणीपातळी सातत्याने घटत आहे. उष्णता आणखी वाढणार असल्याने नागरिकांची पाण्याची गरज वाढणार आहे. बोअरींगचे पाणीपातळी खालवली आहे. परिणामी, पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढतच आहे.
दुसरीकडे, अनेक नागरिक पिण्याच्या पाण्याने अंगण, रस्ते, पार्किंगचा परिसर, जिने व वाहने धुतात. झाडे, बागांना पिण्याचे पाणी घालतात. अनेक घर, बंगले व इमारतींवरून पाण्याच्या टाक्या भरून वाहत असतात. काही जण रस्त्यावर पाणी सोडून देतात. काही वॉशिंग सेंटर चालक पिण्याचे पाणी वापरतात. काही बांधकामांसाठीही पिण्याचे पाणी वापरले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. या तक्रारींची दखल घेऊन वॉशिंग सेंटरसाठी पिण्याचे पाण्याचा वापर होता का,हे तपासावे. पाण्याची नासाडी करणार्या नागरिकांवर कारवाई करावी, असे आदेश सहशहर अभियंता सवणे यांनी संबंधित अधिकारी व कर्मचार्यांना दिले आहेत.