Ajit Pawar : बारामतीसह 5 विमानतळांचा ताबा ‘एमआयडीसी’कडे; उपमुख्यमंत्री पवारांचे निर्देश

Ajit Pawar : बारामतीसह 5 विमानतळांचा ताबा ‘एमआयडीसी’कडे; उपमुख्यमंत्री पवारांचे निर्देश

मुंबई/पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, यवतमाळ आणि बारामती या विमानतळांचे सक्षमीकरण करून विमानसेवा सुरू होण्याच्या द़ृष्टीने ही पाचही विमानतळे खासगी कंपनीला भाडेपट्ट्याने चालविण्यास देण्यात आली होती. मात्र, गेल्या 14 वर्षांत या ठिकाणी विमानसेवा सुरू होऊ शकली नसल्याने त्यांचा ताबा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घ्यावा. यासाठीची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिले.

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विकसित केलेल्या विमानतळांबाबत मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस उद्योगमंत्री उदय सामंत, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर, सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव (विमान चालन) दीपक कपूर, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडेय आदी उपस्थित होते. 'एमआयडीसी'ने विकसित केलेल्या विमानतळांच्या सद्यस्थितीचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, राज्यातील दळण-वळणाचा विकास करतानाच छोट्या शहरांमध्ये विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.

महानगरांतील विमानतळांवरील भार कमी करण्यासाठी राज्याच्या उर्वरित भागात विमानसेवा सुरू झाली पाहिजे. विमानतळासाठी जागा उपलब्ध असणार्‍या ठिकाणी पायाभूत सोयीसुविधा उभारल्या पाहिजेत. काही ठिकाणी विमानसेवा सुरू आहेत, त्यांची वारंवारिता वाढविली पाहिजे. काही विमानतळांवर धावपट्ट्या वाढवल्या पाहिजेत, तर काही ठिकाणी नाईट लँडिंगची सुविधा दिली पाहिजे. यामुळे वाहतूक कोंडीसारख्या समस्या कमी होण्यास मदत होईल. तसेच नागरिकांना परवडणार्‍या दरात विमान प्रवास करता येईल.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने नांदेड, लातूर, धाराशिव, यवतमाळ आणि बारामती या विमानतळांवर पायाभूत सुविधांची उभारणी सुरू केली होती. या प्रक्रियेला वेग देण्याच्या द़ृष्टीने आणि विमानतळांच्या सक्षमीकरणासह हवाईसेवा सुरू करण्यासाठी या पाच विमानतळांचे हस्तांतरण खासगी कंपनीकडे करण्यास 2009 मध्ये परवानगी देण्यात आली होती. परंतु, आज त्यांची परिस्थिती दयनीय आहे. त्यामुळे ही पाचही विमानतळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आपल्या ताब्यात घ्यावीत, असे पवार म्हणाले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news